मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आता अवघे ४८ तास उरले आहेत. या निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपाचे ५, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ उमेदवार उभे आहेत. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि भाजपाला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे अपक्षांना आपल्याबाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्ष तयारी करत आहे.
या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी आमदारांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मत बाद होणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल. राज्यसभेत १ मत बाद झाले होते. पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची मते कुणाला द्यायची ते ठरवलं जाईल. महाविकास आघाडीची एकजूट आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. अपक्षांना काही नेत्यांनी फोन केला हे खरं आहे. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी ते झाले. काही अपक्षांनी उद्धव ठाकरे बोलतील त्यांना मतदान करू असं स्पष्ट सांगितले असं अजितदादा म्हणाले.
तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांची संध्याकाळी होणार आहे. आमच्या आमदारांवर दबाव आणला असं कुणी फोन करून सांगितले नाही. आमदार निवडून देताना प्रत्येकाकडे आपापला कोटा आहे. राज्यसभेत तिन्ही पक्षाकडे काही मते शिल्लक होती. त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु आता शिवसेनेला २ निवडून आणायचे आहेत. संख्याबळानुसार ते निवडून येतील असं चित्र आहे. आम्हाला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही संख्या कमी पडतेय. त्यामुळे अपक्षांना सोबत घेऊन आकडा गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे अशीही माहिती अजित पवारांनी दिली.
दरम्यान, लोकशाहीत आरोप प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही. अपक्षांना मान सन्मान दिला पाहिजे. अपक्षांची मते राष्ट्रवादीला कशी मिळतील यावर आमचे लक्ष आहे. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना सर्व पक्षांचे नेते जाऊन भेटले आहे. स्वातंत्र्य विचाराचे जे आहेत त्यांना भेटून मत मिळवणे हे उमेदवाराचे आणि पक्षाचे काम असते. क्षितीज ठाकूर परदेशात आहेत ते येतील का त्यावर शंका आहे. त्यामुळे २८८ पैकी १ मयत, २ जणांना परवानगी नाही. क्षितीज नाही आला तर २८४ मते आहेत. तर उमेदवार निवडून येण्यासाठी २६ मतांचा कोटा लागेल. पक्षाचे मतदार पक्षाच्या उमेदवारांना मते देतील असं अजित पवारांनी सांगितले.
राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणं हिताचं नाहीअग्निपथ योजनेमुळे देशभरात विविध ठिकाणी हिंसक आंदोलन पेटलं आहे. परंतु राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणे हे कुणाच्या हिताचं नाही. देशाचं नुकसान होते. याची नोंद तरूणांनी घ्यावी. तरूणांची भावना समजू शकतो. सध्या नोकरीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. अग्निपथ योजनेबाबत काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या पाहिजेत. यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे असं अजितदादांनी म्हटलं.