विधान परिषद निवडणूक: भाजपच्या पळवापळवीवर तिन्ही पक्षांची करडी नजर, शिवसेना आमदारांना ताकीद

By यदू जोशी | Published: June 18, 2022 12:34 PM2022-06-18T12:34:17+5:302022-06-18T12:49:33+5:30

Vidhan Parishad Elections 2022: विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने भाजपकडून आमदारांची पळवापळवी केली जाऊ शकते, हे गृहित धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांवर नजर ठेवणे सुरु केले आहे.

Vidhan Parishad Elections: All three parties keep a close eye on BJP's runaway, Shiv Sena MLAs warned | विधान परिषद निवडणूक: भाजपच्या पळवापळवीवर तिन्ही पक्षांची करडी नजर, शिवसेना आमदारांना ताकीद

विधान परिषद निवडणूक: भाजपच्या पळवापळवीवर तिन्ही पक्षांची करडी नजर, शिवसेना आमदारांना ताकीद

Next

- यदु जोशी
मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने भाजपकडून आमदारांची पळवापळवी केली जाऊ शकते, हे गृहित धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांवर नजर ठेवणे सुरु केले आहे. ते कोणाच्या संपर्कात आहेत, याची माहिती गुप्तपणे घेतली जात आहे. शिवसेनेच्या आमदारांना तर माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. 
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या गळाला लागू शकतात. त्यांना भाजपकडून कोणी संपर्क केला का, त्यांचे कोणाशी बोलणे झाले का यावर लक्ष ठेवले जात आहे. राज्यसभेत काही आमदार क्रॉसव्होटिंग करू शकतात अशी चर्चा होती. प्रत्यक्षात तसे झाले नसले तरी ते आमदार प्रामुख्याने रडारवर आहेत. मोबाइलचा वापर अगदी अत्यावश्यक कॉल्ससाठीच करा, असे बजावले जाणार आहे. 

पीएला सोबत नेऊ नका
शिवसेनेच्या आमदारांना वर्षा निवासस्थानी बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले नाही. ते अन्य कार्यक्रमात व्यग्र होते, असे समजते. खा. विनायक राऊत यांनी आमदारांना सूचना केल्या. आगामी तीन दिवसांत माध्यमांशी बोलायचे नाही. हॉटेलवर कोणत्याही नातेवाइकास वा पीएला सोबत न्यायचे नाही, असे त्यांनी बजावले. 

मुक्काम हॉटेलांमध्ये
शिवसेनेचे आमदार शुक्रवारी पवईतील हॉटेलकडे रवाना झाले. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदारही शनिवारपासून वेगवेगळ्या ठिकाणी असतील. काँग्रेसच्या आमदार शनिवारी विधानभवनात येऊन हॉटेलवर जातील. 

संशयाच्या  घेऱ्यात कोण?
- काँग्रेसचे विदर्भातील ३, मराठवाड्यातील २ तर उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचा १ आमदार भाजपकडे झुकू शकतात हे लक्षात घेऊन त्यांच्यावरच लक्ष आहे. 
- शिवसेनेच्या मराठवाड्यातील २, उत्तर महाराष्ट्र, मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी एकाच्या हालचाली टिपल्या जात आहेत. 
- गेल्यावेळी मतदानाला येताना आढेवेढे घेणाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या तीन आमदारांवर पाळत आहे.
- राज्यसभेच्या वेळी गडबड करणाऱ्या मविआ समर्थक अपक्ष आमदारांवरही पाळत आहे. 
- तिकडे खुद्द भाजपचेही दोन आमदार संशयाच्या घेऱ्यात आहेत. 

मलिक, देशमुख यांना मतदानाचा अधिकार नाहीच
कोठडीत असलेले बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. त्यामुळे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. - वृत्त/महाराष्ट्र

Web Title: Vidhan Parishad Elections: All three parties keep a close eye on BJP's runaway, Shiv Sena MLAs warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.