माझ्या सोसायटीत एक नेपाळी वॉचमन आहे. तो रात्रभर ओरडत असतो, 'जागते रहो'. त्याला वाटते की, त्याच्या मुळेच आम्ही सर्व सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला वाटते की त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकला आहे. त्याचा असा समज झाला आहे. हल्ली काय, शाल-बिल घेऊन अशी... म्हणजे, समज झालाय. अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. आमच्यात हिंदू धर्म सांभाळायची ताकद आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. ते विधान परिषदेत बोलत होते.
परब म्हणाले, "माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवन दिली, त्यांनी हे शिकवले नाही की, स्वतःच्या धर्माचे रक्षण करताना दुसऱ्यांच्या धर्मावर जाणीवपूर्वक अन्याय करावा. गेल्या काही दिवसांतील घटना बघा, जाती जातीत तेढ वाढवण्याचे काम केले जात आहे."
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत परब म्हणाले, "बाळासाहेबांनी काय सांगितले, जे कुणी असतील, हिंदू असो अथवा मुस्लीम, जर ते या देशाविरुद्ध काम करतील, तर ते आपल्या देशाचे शत्रू आहेत. दुर्दैवाने, त्यावेळी जे काही बॉम्बस्फोट झाले, ज्या काही गोष्टी झाल्या, त्यात मुस्लीम समाजाचे लोक आढळले. म्हणून बाळासाहेबांची ती वक्तव्ये त्यावेळची होती.
परब पुढे म्हणाले, "ज्या राज्यघटनेने मला अधिकार दिले आहेत, त्या राज्यघटने दिलेल्या माझ्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार ना विरोधक म्हणून मला आहे ना सत्ताधाऱ्यांना आहे. हा अधिकार कोणालाही नाही. यामुळे, मी कसे राहावे, मी काय बोलावे, मी काय खावे, हे दुसरे कोणी ठरवू शकत नाही. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो बजावणारच. त्यात दुसऱ्या कुणाचाही हस्तक्षेप मला मान्य नाही आणि मी तो करूही देणार नाही."