मुंबई - हातातोंडाशी आलेली सत्ता हिरावल्या गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावे लागले. अनपेक्षीतपणे विरोधी बाकावर बसलेल्या भाजपकडून विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. आता विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेता नियुक्त करण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू आहे. या पदासाठी पक्षात आता चुरस निर्माण झाली आहे.
2014 ते 2019 या कालावधीत भाजपच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी चंद्रकांत पाटील विराजमान होते. मात्र ते आता विधानसभेत दाखल झाल्यामुळे विधान परिषदेत भाजपकडून विरोधीपक्षनेते पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. यामध्ये विदर्भातील डॉ. परिणय फुके यांचे नाव आघाडीवर आहे. फुके यांच्याव्यतिरिक्त प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि भाई गिरकर यांचे नावही चर्चेत आहेत.
विधान परिषदेत भाजपचे 22 सदस्य आहेत. तर रासप आणि दोन अपक्षांचे भाजपला समर्थन आहे. याआधी भाजपकडून विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद विदर्भाला अनेक दिवस मिळालेले आहे. नितीन गडकरी आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी हे पद भुषवलेले आहे. त्यामुळे डॉ. फुके यांना पुन्हा संधी मिळणे कठीण दिसत आहे. तर भाई गिरकर यांचे नाव आघाडीवर आहे.