मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे आमदार समोरासमोर आले. काही आमदार सत्ताधारी बाकांवर तर काही विरोधी बाकांवर बसले. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेनंतर विधान परिषदेतही राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले. त्याचसोबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अलीकडेच उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे विधान परिषदेच्या सभागृहात पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधक यांच्यात जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. परंतु नव्या मंत्र्यांची ओळख करून दिल्याशिवाय कामकाज सुरू होणार नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून दिली. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात सभापतीपदावरून आक्षेप घेतला. जयंत पाटील म्हणाले की, या सभागृहातील अधिकार व्यक्ती आहे जे सभागृह चालवतात विधान परिषदेच्या सभापतीपदावर बसलेल्या व्यक्तीचा कुठलाही पक्ष नसतो. त्यांचे पक्ष सदस्यत्व जाते. माझ्याकडे संसदेचे सगळे नियम आहे. त्यावर सत्ताधारी बाकांवर कोर्टात जा असं म्हटल्यावर तुमच्यासाठी कोर्ट सोप्पे आहे असं प्रत्युत्तर जयंत पाटलांनी दिले.
जयंत पाटील बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभे राहून त्यावर पाँईट ऑफ ऑर्डर उपस्थित केला. फडणवीस म्हणाले की, असं कधीही कुठल्याही वेळी सभापतींवर आक्षेप घेता येत नाही. त्याचे काही नियम आहेत. जर नियमांत बसत असेल तर आक्षेप घेता येतो. हा आक्षेप कुठल्याही नियमांत बसत नाही. शोकप्रस्ताव असताना नियमाबाह्य कामकाज चालवता येणार नाही. विनानोटीस असा आक्षेप घेता येणार नाही हा माझा पाँईट ऑफ ऑर्डर आहे. अशाप्रकारे विरोधी पक्षाला सभागृह वेठीस धरता येणार नाही असं त्यांनी म्हटलं.
या गोंधळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांची भूमिका मांडत विरोधकांना खडेबोल सुनावले. मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. गोंगाट करतायेत जे काही करायचे त्याआधी नियमांवर चर्चा करू. आजचे कामकाज होऊद्या. ज्यावेळी शोक प्रस्ताव असतो त्यावेळी दुसरा कुठलाही विषय घेता येत नाही. एकदा चर्चा सुरू केली तर दोन्ही बाजूच्या नेत्यांना बोलायला द्यावे लागेल. गटनेत्यांच्या बैठकीला उपस्थित असता तर तुम्हाला निर्धारित वेळ ठरवून दिला असता. माझ्याविरोधात अविश्वास असेल तर मी माझ्या अधिकारात तुम्हाला तसा ठराव सभागृहात मांडण्याची अनुमती देऊ शकते. परंतु गटनेत्यांच्या बैठकीत तुम्ही आला नाहीत. चर्चा केली नाही. उद्या याला वेळ देण्याबाबत चर्चा करू. आता मी काही ऐकू शकत नाही. मी चर्चेला वेळ देते पण अशाप्रकारे सभागृह चालवू शकत नाही. हे सभागृह नियमाने चालेल असं त्यांनी विरोधकांना ऐकवले.