मुंबई : वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी 11 सप्टेंबरला विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आज चार मतदारसंघांची दुसरी यादी जाहीर केली असून सोलापूरच्या दोन मतदार संघांमध्ये उमेदवार घोषित केले आहेत.
पहिल्या यादीमध्ये पुण्यातील वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव मध्य मतदारसंघांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीमध्ये सांगोला, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार मतदारसंघांचा समावेश आहे. सांगोल्यातून शंकर सरगर, सोलापूर मध्यमध्ये फारूक शाब्दी, सोलापूर दक्षिणमध्ये सुफिया शेख आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून हिना मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दोन आठवड्यांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. त्यातच आता असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा युती तुटली असल्याचा खुलासा केला होता. जलील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून, त्यांच्याच निर्णय अंतिम राहील असे सांगत ओवेसी यांनी वंचितमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले. एक प्रकारे ओवेसीनी आंबेडकर यांना धक्काच दिला. त्यानंतर लगेच इम्तियाज जलील यांच्याकडून पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.