नागपूर/अहमदनगर/सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध ठरविला. प्रतिज्ञापत्रावरील नोटरीच्या मुदतीवर घेण्यात आलेला आक्षेप अधिका-यांनी फेटाळला. याबाबत कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे. तसेच गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अर्जाच्या माहितीवर घेतलेले आक्षेपही निवडणूक निर्णय अधिका-यांनी फेटाळून लावून त्यांचे अर्ज वैध ठरविले.
काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख, जय जवान जय किसानचे उमेदवार प्रशांत पवार व आम आदमी पार्टीचे उमेदवार अमोल हाडके यांनी शनिवारी अर्ज छाननीवेळी मुख्यमंत्र्यांच्या अर्जाबाबत आक्षेप घेत, तो रद्द करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्रावरील नोटरीच्या सीलवर २८ डिसेंबर २०१८ ही तारीख नमूद आहे, तर नोटरीच्या शिक्क्यावर ३ आॅक्टोबर २०१९ ही तारीख आहे. त्यामुळे शपथपत्र अवैध आहे, तसेच रामगिरीसारख्या शासकीय बंगल्याची थकबाकी नसल्याचेही नमूद केले आहे. ही माहिती लपविल्याने त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवावे अशी मागणी विरोधकांनी केली.
निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांनी सुनावणीनंतर सर्व आक्षेप फेटाळून लावले. अधिका-यांनी संबंधितांना अधिकृत आदेशाची प्रतही दिली. दोन तास चाललेल्या सुनावणीत विरोधकांच्या बाजूने अॅड. सतीश उके यांनी तर मुख्यमंत्र्यांकडून अॅड. उदय डबले व अॅड. रितेश कालरा यांनी बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून संदीप जोशी यांनी सर्व आवश्यक कागदपत्र निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर केले.
राधाकृष्ण विखे यांच्या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप नोंदविला होता. प्रतिज्ञापत्रावर मारलेल्या शिक्क्याची मुदत कधी संपते, याचा उल्लेख नव्हता, असे त्यांनी सांगितले. नोटरीचे नूतनीकरण हे २०२१ सालापर्यंत आहे, असे सुनावणीत स्पष्ट झाले.सुभाष देशमुख यांनी विनापरवाना घराचे बांधकाम केल्याची तक्रार करताना अपक्ष उमेदवार आप्पाराव कोरे यांनी अर्जावर हरकत घेतली. मात्र, सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, देशमुख यांना दोषी ठरविण्यात आले नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या बाजूने करण्यात आले. त्यानंतर, हरकत फेटाळून लावण्यात आली.
नांदेड उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डी. पी. सावंत यांनी अर्जासोबत सादर केलेल्या ए व बी फॉर्मवरील नमुना स्वाक्षरीबाबत घेण्यात आलेले आक्षेपही निवडणूक निर्णय अधिकाºयांनी फेटाळले. मात्र, ए व बी फॉर्म न जोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड मतदारसंघातील उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर मतदार संघातून भाजपकडून अर्ज दाखल केला होता. मात्र, ए व बी फॉर्म न जोडल्याने हा अर्ज बाद झाला. पक्षाने त्यांची कन्या रोहिणी यांना उमेदवारी दिली आहे.६७ मतदारसंघांत ७७७ अर्ज वैध : अर्जांची शनिवारी छाननी झाल्यानंतर मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील ६७ विधानसभा मतदारसंघांत ७७७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेसोबत असलेल्या मित्रपक्षांना भाजपने जागा दाखविली. जागा दाखविली म्हणजे मित्रपक्षांना त्यांच्या उमेदवारांसाठी जागा दिल्या.- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखआमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड आहे.- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री