Vidhan Sabha 2019: भाजप-सेना महायुतीपुढे ११४ बंडखोरांचे आव्हान!;अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 06:22 AM2019-10-07T06:22:13+5:302019-10-07T06:23:18+5:30

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५,५४३ उमेदवारांनी नामनिदर्शनपत्रे दाखल केली होती.

Vidhan Sabha 2019: BJP-Sena challenges 5 rebels before Mahayuti; last day to withdraw application | Vidhan Sabha 2019: भाजप-सेना महायुतीपुढे ११४ बंडखोरांचे आव्हान!;अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस

Vidhan Sabha 2019: भाजप-सेना महायुतीपुढे ११४ बंडखोरांचे आव्हान!;अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या (सोमवार) शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीत बंडखोरी झाली असली, तरी बंडखोरांचे सर्वाधिक आव्हान महायुतीपुढे आहे. २७ मतदारसंघांत तब्बल ११४ बंडखोरांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात दंड थोपटले असून, त्यांना शांत करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी दिवसभर ‘हॉटलाइन’वर होते, तर ‘मातोश्री’वरून शिवसेनेच्या बंडखोरांशी संपर्क साधण्यात येत होता.

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५,५४३ उमेदवारांनी नामनिदर्शनपत्रे दाखल केली होती. पैकी ४,७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ‘ए-बी’ फॉर्म वाटपचा घोळ सुरू होता. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुखांना बंडखोरांना रोखण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

महायुतीत भाजप १६४ आणि शिवसेना १२४ असे जागा वाटप झाले आहे. यावेळी भाजपमध्ये आयात उमेदवारांची ‘मेघाभरती’ झाल्याने, या आयारामांना उमेदवारी देण्यासाठी स्वपक्षाच्या १८ आमदारांना नारळ द्यावा लागला आहे. उमेदवारी नाकारली गेलेल्या इच्छुकांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले आहेत. युती होईल की नाही, याबाबत परवापर्यंत शंका असल्याने शिवसेनेने २८८ मतदारसंघात तयारी केली होती. शिवसेनेला या ‘आगाऊ’ तयारीचाच फटका बसण्याची शक्यता आहे. कारण काही अपवाद वगळता शिवसेनेच्या बहुसंख्य उमेदवाराविरोधात शिवसैनिकांनी दंड थोपटले आहेत.

२०१४ ची निवडणूक भाजप-शिवसेनेने स्वबळावर लढविली. त्यामुळे दोन्ही पक्षांत सर्वच मतदारसंघात यावेळी इच्छुकांची भाऊगर्दी होती. महायुतीतील रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती या मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातून जागा दिल्याने नाराज स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बंडखोरीचे पाऊल उचलले आहे. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना आणि शिवसेनेच्या उमेदवारविरुद्ध भाजपचे बंडखोर असे चित्र आहे.

या प्रमुख उमेदवारांसमोर बंडखोरांचे आव्हान
मंत्री विजयकुमार देशमुख, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, मदन येरावार, आ. जयप्रकाश मुंदडा, आमजी आ. गोपालदास अग्रवाल, आ. सुजित मिणचेकर, आ. राजेश क्षीरसागर, आ. भीमराव तापकीर, महापैर मुक्ता टिळक, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. विजयराव औटी, आ. शिवाजी कर्डिले, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. राजेंद्र पाटणी, आ. सीमा हिरे, माजी आ. दिलीप सोपल या प्रमुख उमेदवारांविरोधात बंडखोरांनी आव्हान निर्माण केले आहे.

बंडखोरांना मुख्यमंत्र्यांचा इशारा : ज्यांनी बंडखोरी केली आहे ते माघारही घेतील, पण जे घेणार नाहीत, त्यांचा दारुण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. बंडखोर आमचा असो की शिवसेनेचा, त्याला आधी समजावून सांगू अन् नाहीच ऐकलं तर त्याची जागा दाखवू, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.

आघाडीतही बिघाडी :काँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीतही काही ठिकाणी बिघाडी झाल्याचे चित्र आहे. विशेषत: सोलापूर जिल्ह्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी दिल्याचा राग म्हणून काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना भालकेंविरोधात उभे केले आहे, तर या खेळीला प्रत्युत्तर म्हणून शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्टÑवादीने जुबेर बागवान यांची उमेदवारी दाखल केली आहे. सोलापूरचा हा तिढा सुटला नाही, तर त्याचे पडसाद इतर मतदारसंघात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Vidhan Sabha 2019: BJP-Sena challenges 5 rebels before Mahayuti; last day to withdraw application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.