निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या अन् आचारसंहिताही. आता वेध आहेत ते पितृपक्ष संपण्याचे. एकदा हा पंधरवडा संपला रे संपला की सुरू होईल इलेक्शन घाई. मग कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून प्रचारात दिसतील. सध्या सुरू आहे ती केवळ चर्चा. चर्चेत मुद्दा एकच असतो तो याची तिकीट कापणार? भलेही आतले काही माहिती नसते. यादी फायनल झाली तरी कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्यांना सांगून ती होणार नाही. पण, अनेक निष्ठावंत छातीठोकपण सांगतात...भाऊचा पत्ता कट यावेळी. काय कामं केली तुम्हीच सांगा. साहेब नाराज आहेत त्यांच्यावर. काय होते हो अस्तित्व...आमदार झाले ते साहेबांच्या भरवशावर. पाच वर्षात कामं करून जनतेचं मन जिंकायला हवं होतं. पण, पद आलं की अंगात हवा शिरते. बघा...यावेळी कसा कटतो नंबर. मला माहिती आहे. (पक्षातीलच दोन निष्ठावंत कार्यकर्त्यांतील हा संवाद) सध्या पक्ष कार्यालयात निवडणुकीची कमी पण तिकीट कुणाचं कापणार हीच चर्चा आहे. नागपुरात तर अख्खे भाजपचेच राज्य आहे. पण, काही मतदारसंघात फेरबदलाची हवा आहे. ती भलेही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली असेल अथवा पदाधिकाऱ्यांनी. या हवेत लाथा मारण्याची संधी मात्र कुणी सोडताना दिसत नाही. चार दिवसापूर्वी तर कुण्या तरी निष्ठावंताने महाराष्ट्रातील काँग्रेसची मतदारसंघनिहाय तिकीटेच जाहीर करून दिली. जशी की काँग्रेसने ती अधिकृत घोषित केली. आता भाजप, शिवसेना अथवा इतर पक्षाच्या अशा डुप्लिकेट याद्याही जाहीर होण्याआधीच सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या दिसतील. जे व्हायरल करायचे ते कार्यकर्ते करणार नाहीत. पण, जे नाही करायचे त्याचीच चर्चा अधिक रंगलेली दिसेल. पक्षाचे भलेही आतून ठरलेले असेल. ते यादी जाहीर होईस्तोर आपल्याला कळणार नाही. (पण...भाऊचे तिकीट कटेल. यांना मिळेल. हे बोलायला काय जातं!)
-बालाजी देवर्जनकर