मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे. आघाडीची घोषणा झालेली असली तरीही युतीचे मात्र भिजत घोंगडे आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून खलबते सुरू असून दोन्हीकडच्या नेत्यांकडून युती तुटण्याची वक्तव्ये, संकेत देण्यात येत आहेत. तर भाजपाने समसमान जागा न देता 120 च्या आसपास जागा देण्याचा प्रस्ताव ठेवल्याने शिवसेनेमध्ये नाराजी आहे. याशिवाय भाजपाच्या इनकमिंगमुळे शिवसेनेच्या जागांची अदलाबदलही होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपा स्वबळावर लढणार की शिवसेनेसोबत युती करणार याची घोषणा येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर शिवसेनेने युतीसाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभुमीवर एबीपीमाझाने सीव्होटरसोबतचा सर्व्हे जारी केला आहे. यामध्ये शिवसेना, भाजपा एकत्र लढल्यास महायुतीला 205 जागा आणि महाआघाडीला 55 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर इतर पक्ष-अपक्षांना २८ जागा मिळणार आहेत. मात्र, युती झालीच नाही तर भाजपाचाच फायदा असल्याचे यामध्ये समोर आले आहे.
युती झाली नाही तर भाजपाला 288 पैकी 144 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपाची सत्ता स्वबळावर येण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला केवळ 39 जागा दाखविण्यात आल्या आहेत. मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने याचा फटका शिवसेनेला बसणार असून मनसेला मात्र भोपळाही फोडता येणार नसल्याचे दिसत आहे. तर आघाडी तुटल्यास काँग्रेसला 21 आणि राष्ट्रवादीला 20 जागा मिळणार आहेत. भाजपाला बहुमताचा आकडा गाठता न आल्यास इतर पक्ष आणि अपक्षांची चांदी होणार आहे. त्यांना या सर्व्हेमध्ये 64 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर भाजपाची सत्ता येईल असे ५५ टक्के लोकांचे मत आहे. आणि शिवसेनेच्या पारड्यात 8 टक्केच लोकांनी मते टाकली आहेत. काँग्रेसची सत्ता येईल असे ११.९ टक्के लोकांना वाटत आहे.
झी 24 तास काय म्हणतो...दुसरीकडे झी 24 तासने केलेल्या प्री एक्झिट पोलमध्ये याच्या उलट स्थिती दिसत आहे. भाजपाला यामध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नसल्याचे म्हटले आहे. युती झाल्यास भाजपाला 143, शिवसेनेला 83, काँग्रेसला 26, राष्ट्रवादीला 26 आणि इतरांना 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
तर युती आणि आघाडी न झाल्यास भाजपाला गेल्या वेळ इतकेच बहुमत मिळणार असून 122 जागांवर भाजपाचे आमदार निवडून येणार आहेत. तर शिवसेनेला 52, काँग्रेसला 48, राष्ट्रवादीला 45 आणि इतरांना 21 जागा मिळतील असे या सर्व्हेमध्ये दिसत आहे.