- दिनकर रायकर
भाजपने यंदा काही नेत्यांना कसे घरी बसविले, याची चर्चा जोरात सुरू आहे. त्याबद्दल काही जण त्या पक्षाचे कौतुक करीत आहेत, तर विरोधी पक्ष त्यावर टीका करीत आहेत. पण सत्तारुढ पक्षाने मंत्री किंवा आमदारांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकीटे कापण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यात १९८५ सालच्या विधानसभा निवडणुकांत त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी निम्म्यांहून अधिक मंत्री व आमदारांची तिकीटे कापली होती. त्यावेळी वृत्तपत्रांनी या बातम्यांना ‘मध्यरात्रीचे शिरकाण’ असे वर्णन केले होते.
१९७८ ला इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून इंदिरा काँग्रेसची स्थापना केली होती. ज्याला ‘काँग्रेस आय’ म्हणून ओळखले जात होते. जे लोक काँग्रेस आयमध्ये नव्हते, त्यांना रेड्डी काँग्रेस मधील म्हणून ओळखले जात होते. पुढे रेड्डी काँग्रेसमधील वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण आदी दिग्गजांसह अनेक नेतेही काँग्रेस आयमध्ये आले. त्यानंतर १९८० साली लोकसभा व नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आयचा विजय झाला. तरीही काँग्रेस आयचे मूळ निष्ठावान आणि नंतर आलेल्या रेड्डी काँग्रेसचे निष्ठावान यांच्यात दोन गट पडले. त्यांच्यात शितयुद्ध सुरू झाले होते.
हे शीतयुद्ध १९८० ते १९८५ असे चालूच होते. या काळात मूळ निष्ठावंतामधील बॅ. ए. आर. अंतुले आणि बॅ. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होऊन गेले होते. मात्र रेड्डी काँग्रेसमधून आलेल्या वसंतदादांनी राजकारण करत मूळ निष्ठावंतांना डावलून स्वत: मुख्यमंत्रीपद मिळवले होते. इंदिरा गांधी यांची ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि काही महिन्यांनी, मार्च १९८५ ला महाराष्टÑात विधानसभा निवडणुका लागल्या. त्यावेळी वसंतदादांनी राजीव गांधी यांच्याकडे आपले वजन वापरुन मूळ निष्ठावंत काँग्रेसच्या अर्ध्याहून अधिक मंत्री व नेत्यांची तिकीटे कापली होती. इंदिरा गांधी नसल्यामुळे तिकीट कापले गेलेल्यांचे ऐकून घेण्यासही कोणी नव्हते, याचा अचूक राजकीय लाभ वसंतदादांनी उचलला होता.
काँग्रेस आयमधील मूळ निष्ठावंतांनी वसंतदादांच्या विरोधात डॉ. बळीराम हिरे यांना तुम्हीच आमचे नेते म्हणत, त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करणे सुरूकेले होते. ही खेळी हाणून पाडण्यासाठी वसंतदादांनी डॉ. बळीराम हिरे यांचेच तिकीट कापून टाकले. ही खेळी एवढी जबरदस्त होती की वसंतदादा आणि बळीराम हिरे दोघे रात्री उशिरा एकाच विमानाने दिल्लीहून मुंबईत आले. विमानातच त्यांनी हिरे यांना तुमचे तिकीट पक्षश्रेष्ठींनी नाकारले आहे हे सांगून टाकले. शिवाय दिल्लीतही वसंतदादांनी जबरदस्त फिल्डींग लावली होती.
तिकीट नाकारल्याचे कळताच डॉ. हिरे सकाळी दिल्लीत फोनाफोनी करतील आणि ए/बी फॉर्म्स मिळवण्याचा प्रयत्न करतील हे त्यांना माहीत होते. त्यामुळे ज्यांच्याकडे हिरे फोन करणार होते, त्याच महाराष्टÑाच्या प्रभारी असलेल्या नेत्याला दादांनी कळविले की, डॉ. हिरे यांचा फोन आला की तो तुम्ही घेऊ च नका. परिणामी हिरे यांना उमेदवारी अर्जही भरता आला नाही आणि दादांच्या मार्गातील मुख्यमंत्रीपदाचा अडसर असा दूर केला गेला. मात्र हे करताना दादांनी हिरे यांच्या पत्नी इंदिरा हिरे यांना उमेदवारी देऊन उरला सुरला विरोधही कमी करुन टाकला होता. आपण काँग्रेसला बहुमत मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी राजीव गांधी यांना दिली होती व त्यांना स्वत:लाही तशी ठाम खात्री असल्यामुळेच ते ही खेळी करू शकले.
या निवडणुकीत भाजपने १९८५ च्या काँग्रेसप्रमाणेच खेळी गेली. विजयाची पूर्ण खात्री झाल्याने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे तसेच प्रकाश मेहता आदी मंत्री व अनेक आमदारांना दूर सारले. एकनाथ खडसे यांच्या मुलीला तिकीट देऊन त्यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी पुरेसे वा पोषक काम न करणाऱ्यांना हा एका प्रकारे श्रेष्ठींनी दिलेला इशाराच आहे! ही तिकिटे कापण्यात दिल्लीचा हात आहे.