मुंबई – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा आमदार स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे याच मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावून बसलेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे आणि जिल्ह्या परिषद सदस्य राजेश परजणे यांचा पत्ता कट झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी आप-आपल्या पक्षात फिल्डिंग लावली होती. त्यामुळे कुणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार याची चर्चा प्रत्येक मतदारसंघात पाहायला मिळत होती. कोपरगाव मतदारसंघात सुद्धा परजणे यांनी दंड थोपटल्याने भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता लागली होती. मात्र आता ऐनवेळी पुन्हा कोल्हे यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.
कोपरगाव मतदारसंघातून यावेळी भाजपकडून इच्छुकांची संख्या वाढली होती़. त्यातच राधाकृष्ण विखे पाटलांचे मेहुणे आणि शालिनीताई विखे यांचे धाकटे भाऊ राजेश परजणे यांनी सुद्धा निवडणूक लढवणारच, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे विखे कुटंबाचे भाजपमधील वजन पाहता परजणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र पक्षाने त्यांना डच्चू दिला असून कोल्हे यांना पुन्हा उमेदवारी दिली.
परजणेंची भूमिका काय असणार ?
राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थिती लढवायचीचं असा संकल्प केला होता. तर परजणे यांनी माघार घेऊ नयेत म्हणून, त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव आहे. त्यामुळे ते अपक्ष रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र ऐनवेळी ते काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.