Vidhan Sabha 2019 : शिवसेना 171 वरून 126 जागांवर !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:34 PM2019-09-23T12:34:15+5:302019-09-23T12:34:54+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : भाजपकडून सुरुवातीला शिवसेनेला 105 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र शिवसेनेने तो प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपकडून 126 जागांचा प्रस्ताव नव्याने मांडण्यात आला असून तो शिवसेनेने मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीच्या बोलणीला वेग आला आहे. परंतु, शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीत दररोज नवनवीन घडमोडी घडत असून अद्याप उभय पक्षांच ठरल नाही. मात्र शिवसेना 126 जागांवर तयार झाल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
2014 मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्वबळावर लढले होते. त्यावेळी सर्वच पक्षांनी राज्यातील आपली ताकद आजमावून पाहिली होती. यात भाजपला चांगलेच यश मिळाले होते. 122 जागांसह भाजप पहिल्या क्रमांकांचा पक्ष ठरला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती विधानसभेला देखील कायम राहिल असं ठरलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा युतीची चर्चा लांबवून उभय पक्षांकडून शिळ्या कढीला उत आणला जात आहे.
दरम्यान अमित शाह रविवारी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी युतीचा फॉर्म्युला ठरविल्याचे सांगण्यात येते. भाजपकडून सुरुवातीला शिवसेनेला 105 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र शिवसेनेने तो प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपकडून 126 जागांचा प्रस्ताव नव्याने मांडण्यात आला असून तो शिवसेनेने मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेने 2014 मध्ये स्वबळावर निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र शिवसेना 126 जागांवर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. 2014 पूर्वी शिवसेना 171 जागांवर आणि भाजप 117 जागांवर निवडणूक लढवत होते. मात्र भाजपची वाढलेली ताकद पाहता शिवसेना 171 वरून 126 जागांवर आल्याचे चित्र आहे.