मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळात खातेवाटप आणि खातेबदल झाल्याने अनेक मंत्र्यांची तारांबळ उडणार आहे.
अधिवेशनात आपल्या खात्यावरील प्रश्नाला मंत्र्यांना उत्तर द्यावे लागते. अनेक मंत्र्यांची खाती बदलल्याने या मंत्र्यांना तयारी करायलाही वेळ मिळणार नाही. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्र्यांना कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. त्यातच विरोधकांनी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी चालविली आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे प्रश्न वगळलेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजातून या मंत्र्यांचे प्रश्न वगळण्यात आले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाच्या ४० ते ४५ दिवस आधी आमदारांना लेखी प्रश्न द्यावे लागतात. त्यानुसार आमदार प्रश्न पाठवतात. मात्र, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने त्यांचे प्रश्न आता वगळण्यात आले आहेत. तसेच इतर आमदारांच्या प्रश्न सूचनेबाबत वरील नावे जोडण्यात आली असतील तर ती वगळण्यात यावीत, असे विधान मंडळाने स्पष्ट केले आहे.
राज्यमंत्र्यांविना मंत्रिमंडळया मंत्रिमंडळात सगळे २९ मंत्री कॅबिनेट आहेत. एकही राज्यमंत्री नाही. कॅबिनेटमंत्री एका सभागृहात बसून दुसऱ्या सभागृहात राज्यमंत्र्यांना पाठवतात. त्यामुळे कोणत्याही सभागृहाचे कामकाज अडत नाही. मात्र, यावेळी कॅबिनेटमंत्र्यांना ही अडचण येऊ शकते. फ्लोअर मॅनेजमेंट करताना सत्तापक्षाची कसरत होऊ शकते.
अधिवेशनात काय होणार?मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्याकडील खाती अधिवेशनापुरती सहकारी मंत्र्यांना वाटून देतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र सगळ्या खात्यांची उत्तरे देतात. कार्यबाहुल्यामुळे शिंदे याहीवेळी काही खाती अधिवेशनात उत्तरे देण्यापुरती सहकाऱ्यांना देण्याची शक्यता आहे.