मुंबई : पुण्यासह राज्यातील पब आणि बारमध्ये नियमांचे पालन होत आहे का, हे तपासण्यासाठी ‘एआय’ कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केले. पोर्शेकार दुर्घटनेप्रकरणी पुण्याच्या पोलिस आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी फेटाळली.
पुण्यातील कल्याणी नगर अपघातप्रकरणी उद्धवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्यासह विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, भास्कर जाधव, रोहित पवार, रवींद्र धंगेकर यांनी लक्ष्यवेधी उपस्थित केली होती. विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील बार, पबधारकांकडून हप्ते उकळले जात आहेत, त्याचे रेटकार्ड ठरलेले आहे, पुण्याचा उडता पंजाब झाला आहे असा गंभीर आरोप केला. फडणवीस यांनी हा आरोप फेटाळला पण सभागृहाचे सदस्य माहिती देतात ती खरी मानून चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.
पुण्यातील दुर्घटनेबाबत ते म्हणाले की, ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्यावर सरकारने तत्काळ कारवाई केली आहे. तरुण पिढीला ड्रग्जचा विळखा लावण्याचा प्रयत्न चालला आहे. पूर्वी बाहेरून ड्रग्ज आणावे लागत होते पण आता ते केमिकलपासून बनवले जातात, सरकारने त्यावरही कारवाई केली असून ड्रग्जच्या बाबतीत झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू आहे. पोलिसांचा जर त्यात सहभाग आढळला तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. पुण्यातील ७० अनधिकृत पबवर कारवाई केली आहे.
‘पुण्याची बदनामी करू नका’वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यात ड्रग्ज माफियांनी थैमान घातले आहे. शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे त्याच पुण्यात बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यात पाठवावे की नाही याची पालकांना चिंता वाटते. अपघात झालेली कार विना नंबर प्लेट रस्त्यावर कशी फिरली, पोलिसांच्या हे का लक्षात आले नाही?
यावर अशा पद्धतीने पुण्याची बदनामी करणे योग्य नाही. सांस्कृतिक व शैक्षणिक शहर अशी पुण्याची ओळख आहे, आपण शहराबाबत टीका केली तर त्याचा दुष्परिणाम गुंतवणुकीवर होऊ शकतो, असे फडणवीस म्हणाले. पुण्याच्या आयुक्तांनी अधिक सक्रिय होऊन दुर्घटनेसंदर्भात कारवाई केली पण वैद्यकीय चाचणी उशिरा करणे, रक्ताचा नमुना बदलणे असे जे प्रकार घडले त्याबाबत पोलिसांनी व राज्य सरकारने तातडीने कारवाई केली असेही ते म्हणाले.
राजकीय दबाव नाहीआमदार रोहित पवार यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेनंतर काही राजकीय नेते मंडळींनी दबाव टाकल्याचा आरोप चर्चेदरम्यान केला. मात्र, गृहमंत्री फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला. या प्रकरणी कोणत्याही मंत्र्यांचा पोलिसांना फोन आलेला नाही. स्थानिक आमदार पोलिस ठाण्यात गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आलेले आहे. त्याची नोंद घेण्यात आली आहे, मात्र याप्रकरणी कोणीही दबाव आणलेला नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.