"तुफानों में संभलना जानते हैं..."; अर्थसंकल्पीय भाषणातून अजित पवारांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 06:06 AM2024-06-29T06:06:17+5:302024-06-29T06:46:02+5:30

जगद्गुरू तुकोबारायांच्या भाषेत प्रार्थना करून अजित पवार यांनी आपले अर्थसंकल्पीय भाषण संपविले. 

Vidhan Sabha: Ajit Pawar taunts the opposition in his budget speech | "तुफानों में संभलना जानते हैं..."; अर्थसंकल्पीय भाषणातून अजित पवारांचा विरोधकांना टोला

"तुफानों में संभलना जानते हैं..."; अर्थसंकल्पीय भाषणातून अजित पवारांचा विरोधकांना टोला

मुंबई - ‘तुफानों में संभलना जानते हैं, अंधेरों को बदलना जानते हैं। चिरागों का कोई मजहब नही हैं, ये हर महफिल मे जलना जानते हैं।’ लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे वादळ आले, पण अशा वादळांतून कसे सावरायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे, असाच इशारा जणू वित्त मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना दिला. 

समाजातील विविध घटकांना सुखावणाऱ्या घोषणा अर्थसंकल्पात केल्यानंतर अजित पवारांनी, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेकर चलो।’हा शेर सुनावला.त्यांच्या भाषणात अभंगांचीही पेरणी होती. जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीने आषाढी एकादशीसाठी आजच प्रस्थान केले आहे, ज्ञानोबा माऊलींची पालखी उद्या निघणार आहे, असे म्हणत त्यांनी ‘उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संतजन, ऐसे हरिचे दास ऐसा नामघोष सांगा कोणे, तुका म्हणे आम्हा अनाथाकरणे, पंढरी निर्माण केली.’ हा अभंग ऐकवत ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’, असा जयघोष केला आणि सभागृहानेही तसाच जयघोष केला. 

आपण राज्याचा अर्थसंकल्प दहाव्यांदा सादर करत आहोत. ‘निंदा कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी मज हे ही नाही ते ही नाही, वेगळा दोन्हींपासुनी...’ या न्यायाने केलेल्या कामाची ही पोचपावती आहे, असे मी मानतो, अशी टिप्पणी अजित पवार यांनी भाषणात केली.‘तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही...अशी जगद्गुरू तुकोबारायांच्या भाषेत प्रार्थना करून अजित पवार यांनी आपले अर्थसंकल्पीय भाषण संपविले. 

तीर्थस्थळे, स्मारकांसाठी काय तरतुदी?

  • नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थस्थळ आहे. रामटेक विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात १५०  कोटी रकमेच्या कामांना मान्यता. दुसऱ्या टप्प्यात २११ कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
  • आध्यात्मिक गुरू तथा समाजसुधारक बाबा जुमदेवजी यांच्या पावडदौना (ता. मौदा, जि. नागपूर) येथील स्मारकासाठी ७७ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात येणार.
  • संत ज्ञानेश्वर महाराजांनी अजरामर ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली, त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करणार.
  • कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारणार.
  • छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा (जि. सांगली) येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल.
  • संत श्री रूपलाल महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती) येथे त्यांचे स्मारक उभारणार.
  • आदिवासी कलांचे प्रदर्शन, वृद्धी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हतगड (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथे कलादालन स्थापन करणार
  • जिल्हा स्तरावर संस्थात्मक क्षमता वाढवून विकासाला चालना देण्यासाठी ‘महास्ट्राईड’ या २ हजार २३२ कोटी रुपये किमतीच्या आराखड्यास मान्यता.

 

Web Title: Vidhan Sabha: Ajit Pawar taunts the opposition in his budget speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.