लाज वाटते का..? असे कुणी कुणाला नाही विचारायचे; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 08:46 AM2024-07-03T08:46:02+5:302024-07-03T08:46:50+5:30

सरकारला लाज वाटते का किंवा विरोधकांना लाज वाटते का, असे विचारणे म्हणजे असंसदीय भाषा वापरणे आहे, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Vidhan Sabha: Are you ashamed..? No one should ask that; Instructions of President Rahul Narvekar | लाज वाटते का..? असे कुणी कुणाला नाही विचारायचे; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

लाज वाटते का..? असे कुणी कुणाला नाही विचारायचे; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

मुंबई - एखाद्याला लाज वाटते आहे का, असा प्रश्न विचारल्यास हा शब्दप्रयोग असंसदीय असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिला. विधानपरिषदेत सोमवारी शिवीगाळ झाली होती, मंगळवारी लाजेचा विषय निघाला. 

महाराष्ट्राला जोडणाऱ्या ‘लालपरी’ची म्हणजेच एसटीची रडकथा आज विधानसभेत मांडली गेली आणि सर्वपक्षीय सदस्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. आमदार कृष्णा गजबे, बंटी भांगडिया, सुभाष देशमुख, रणधीर सावरकर आदी आमदारांनी हा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. मंत्री दादा भुसे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांबद्दल स्थापित समितीच्या दोन बैठका झाल्या असून, लवकरात लवकर समितीचा अहवाल घेऊन हे प्रश्न सोडवले जातील, असे सांगितले. फेब्रुवारीमधे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दोन आठवडे उपोषण केले होते. 

हे असंसदीयच..
लाज वाटणे म्हणजे नेमके काय, शरम वाटणे म्हणजे नेमके काय... आपल्याकडून चुकीचे वर्तन झाल्यास एखाद्या व्यक्तीला लाज वाटते किंवा शरम वाटते. भले ती व्यक्त होवो वा न होवो; पण सरकारकडून असे काही झाले तर लाज वाटते का किंवा शरम वाटते का... वाटो वा, न वाटो; पण सरकारला लाज वाटते का, असा शब्दप्रयोग करणे राज्याच्या विधानसभेने यापूर्वीच असंसदीय ठरवलेले आहे. थोडक्यात, सरकारला लाज वाटते का किंवा विरोधकांना लाज वाटते का, असे विचारणे म्हणजे असंसदीय भाषा वापरणे आहे, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

बच्चू कडू झाले संतप्त अन् म्हणाले...
त्यावेळी उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेनंतर संघटनेने उपोषण मागे घेतले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार दहा तारखेच्या आत दिले जातात, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले; तसेच बाकीच्या विषयांबद्दल समितीचा अहवाल प्राप्त करून घेऊन कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. बच्चू कडू यांनी संतप्त प्रश्न विचारत सरकारला लाज कशी वाटत नाही आणि सरकार असत्य सांगत असेल तर कुणाच्या मुस्काटात मारायची, असा प्रश्न विचारला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही सदस्यांनी किंवा मंत्र्यांनीही असंसदीय शब्द वापरला तर तो कामकाजातून काढला जाईल.

‘लाज वाटत असेल तर’ हा शब्दप्रयोग असंसदीय असल्याचा निवाडा विधानसभेत यापूर्वी दिला गेला असल्याचे निदर्शनास आणून देत बच्चू कडू, तसेच दादा भुसे यांनी वापरलेले हे शब्द कामकाजातून काढून टाकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, एसटीच्या वाहक आणि चालक यांना ३८ हजार रुपये सरासरी पगार मिळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Vidhan Sabha: Are you ashamed..? No one should ask that; Instructions of President Rahul Narvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.