Vidhan Sabha Budget Session: शिंदे सरकारला लक्षवेधीही पेलवेना; उत्तराला मंत्रीच गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 07:02 AM2023-03-01T07:02:58+5:302023-03-01T07:03:40+5:30
मंत्रिमंडळ विस्ताराअभावी सरकारची सभागृहात कसरत; लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ २० कॅबिनेट मंत्र्यांच्या भरवशावर कारभार चालू असल्याने अडचणींचा सामना करताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचा प्रत्यय मंगळवारी विधानसभेत आला. मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही ते माहिती नाही; पण त्यामुळे राज्याचे नुकसान होत असल्याची टीका काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली, तर मंत्र्यांच्या टंचाईवर दोन्ही सभागृहांतील कामकाजाची विभागणी करण्याचा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिल्या दोन लक्षवेधी राखून ठेवल्याचे सांगत थेट चौथी लक्षवेधी पुकारली. ही लक्षवेधी सार्वजनिक आरोग्य विभागाची होती. त्यावेळी मंत्री तानाजी सावंत सभागृहात उपस्थित नसल्याने या लक्षवेधीला उत्तर कुणी द्यायचे, असा पेच निर्माण झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला.
अजित पवार यांनी यावेळी सरकारला कामकाज सुरळीत सुरू राहावे म्हणून काही सूचना केल्या. मंत्रिमंडळात २० सदस्य आहेत आणि तेही कॅबिनेट मंत्री आहेत. कोणत्याही सरकारमध्ये खालच्या सभागृहात कॅबिनेट मंत्री, तर वरच्या सभागृहात राज्यमंत्री उत्तर देतात; पण या सरकारमध्ये राज्यमंत्री नाहीत. त्यामुळे सरकारला वरच्या आणि खालच्या सभागृहातील कामकाज जुळवून घ्यावे लागेल. आता लक्षवेधी पुकारल्यावर सगळे जण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. हे टाळण्यासाठी मंत्र्यांच्या कामाचे वाटप करावे लागेल, असे पवार म्हणाले.
‘पुन्हा अशी वेळ येऊ देऊ नका’
आम्ही सत्ताधारी बाकांवर असताना आता कोणत्या मंत्र्यांचे काम आहे याकडे लक्ष देत होतो. ही जबाबदारी संसदीय कामकाजमंत्र्यांची आहे. त्यामुळे लक्षवेधी पुकारल्यावर मंत्री सभागृहात नाहीत, असा प्रसंग आल्यावर आम्ही उठणार, बोलणार आणि अध्यक्षांच्या लक्षात आणून देणार. त्यामुळे अशी वेळ येणार नाही याची खबरदारी घ्यावी, या असेही अजित पवार यांनी सुनावले.