Maharashtra Politics: पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा या राज्यात येत्या १६ फेब्रुवारीला तर मेघालय व नागालँडमध्ये येत्या २७ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यासह राज्यातील पुणे आणि कसबा विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या २७ फेब्रुवारीला पोटनिवडणुका होतील. यावरून भाजप-शिंदे गट तसेच महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, या रिक्त जागांवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी, असा भाजपचा प्रयत्न असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपने पंढरपूर, कोल्हापूर येथे पोटनिवडणूक लढवल्याचा दाखला यावेळी दिला जात आहे. शिवसेनेने काँग्रेसच्या कसबा मतदार संघावर हक्क सांगितल्याने महाविकास आघाडीतही कुरबुरी होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचा कसबा मतदार संघासाठी दावा
महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने कसबा मतदारसंघासाठी दावा केला आहे. या मतदारसंघात दोनवेळा काँग्रेस उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसकडून काही नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. तर दुसरीकडे, लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांनी नंतर भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे चिंचवडची जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. मात्र, भाजपकडून लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. तर, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची नावे पुढे येत आहेत.
दरम्यान, पुणे शहर व पिंपर चिंचवडमधील पोटनिवडणूक म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट असल्याचे सांगितले जात आहे. ही निवडणूक बिनविरोध न करता सर्व पक्ष आपली ताकद अजमवण्याचा प्रयत्न करणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"