मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात मोठ्याप्रमाणावर अयारामांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे निष्ठावंत आणि आयाराम अशी दोन गट भाजपमध्ये निर्माण झाले असून, नवीन कार्यकर्त्याना बैलासारखे शिंग मारु नये त्यांना सांभाळून घ्यावे असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना म्हणण्याची वेळ आली. विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली तर सहजपणे तिची फळे चाखणाऱ्या आयारामांच्या गर्दीत आपला निभाव लागण्याची शक्यता कमी असल्याने, निष्ठावंतांच्या वेदना ठसठसू लागल्या असल्याची चर्चा आहे.
एखाद्या पक्षाची सत्ता येणार असल्याचे वातावरण असल्यास अयारामांची तिकडे गर्दी सुरु होते. भाजपमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मेघा भरती सुरु आहे. पक्षात येणाऱ्या नवीन नेत्यांसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचा घोळका सुद्धा आपल्या साहेबांबरोबर नवा झेंडा हातात घेत असतात. मात्र आता याच आयाराम आणि निष्ठावंत यांच्यात नव्या-जुन्यांचा वाद उफाळून येत असल्याचे दिसत आहे.
नुकतेच पैठण येथील भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. युती बाबतचा निर्णय अजूनही झाला नसताना सुद्धा नव्याने पक्षात आलेले नेते पक्षाकडून आपणच उमेदवार असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण करत असल्याचे सांगत या शिष्टमंडळाने दानवेंसमोर कैफियत मांडली. तसेच मतदारसंघ जर भाजपला सुटला किंवा युती झाली नाही तर जुन्यांपैकी असेल्या इच्छुकाला उमेदवारी देण्याची मागणी सुद्धा यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दानवेंकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणुकीपूर्वी केलेल्या इनकमिंगमुळे भाजपात मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे या मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ की काय अशी भीती वाटते आहे, असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तर पक्षात आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना साभाळून घेण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी दिला होता. मात्र सत्ता नसताना सुद्धा पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंताना डावलून आयाररामांना संधी दिली जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे, हे ही तितकेच सत्य आहे.