मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीचे वार वाहू लागले असून, राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. गेल्या तीन वेळापासून या मतदारसंघात राष्ट्रवादीने आमदार राहुल मोटेंच्या रूपाने आपला गड कायम ठेवला आहे. मात्र यावेळी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हे या मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याने, आमदार मोटे विजयाचा चौकार लावणार का ? अशी राजकीय चर्चा मतदारसंघात सुरु आहे.
परंडा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत सलग मोटेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत मतदारसंघाच नेतृत्व आपल्याकडे कायम ठवले. २०१४ मध्ये मोदी लाटेत सुद्धा मोटे यांनी ७८ हजार ५४८ मते मिळवत १२ हजार ३८९ मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी त्यांचाकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.
मात्र असे असलेही तरीही, परंडा मतदारसंघातून हॅटट्रिक करणाऱ्या मोटे यांच्यासमोर यावेळी शिवसेनेचे तगडे आव्हान असणार आहे. कारण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत चाचपणी करत आहेत. विशेष म्हणजे सावंत यांनी मतदारसंघात विकास कामांचा धडाकाच लावला आहे. कारखानदारीच्या माध्यमातून राजकरणात आलेल्या सावंत यांनी मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत परंडा मतदारसंघातून ते जोर लावणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आमदार मोटे विजयाचा चौकार लावणार की सावंत हे विधानसभेत आपला खात खोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गेल्यावेळी भाजप-शिवसेना वेगवेगळी लढल्याने मतांचे विभाजन झाले होते. मात्र जर यावेळी या दोन्ही पक्षात युती झाली तर, याचा फायदा सुद्धा सावंत यांना होणार आहे. त्यामुळे युतीचा निर्णय परंडा मतदारसंघातील राजकीय फेरबदल करू शकते अशी चर्चा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. मात्र सत्ता नसतानाही आमदार मोटे यांनी जिल्हा परिषद,पंचायत समिती यांच्या माध्यमातून निधी खेचून आणत जनसंपर्क कायम ठेवला असल्याने त्याचा फायदा त्यांना होणार आहे. त्यामुळे परंडा मतदारसंघातील जनता कुणाला खुर्ची तर कुणाला मिर्ची देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.