यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे सर्वत्र मानले जात असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होईल, अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. नियमानुसार नवीन विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात येणार आहे, त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता, प्रचाराचा धुराळा कशासाठी, असा प्रश्न विचारला जात असून त्यामुळेच दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
नवीन विधानसभेचे पहिले अधिवेशन ज्या दिवशी होते त्या दिवसापासून पाच वर्षे ती विधानसभा अस्तित्वात असते. २०१९ मधील निवडणुकीनंतर राज्यात नाट्यपूर्ण राजकीय घटना घडल्या होत्या.
आयोगात तूर्त हालचाली नाहीत
- महायुतीच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की, पावसाळ्यात निवडणूक प्रचारात अनेक अडचणी येतील, शेतीची कामेही मोठ्या प्रमाणात सुरू असतात. - सणासुदीच्या तोंडावर निवडणूक घेण्याऐवजी दिवाळीनंतर ती घ्यावी, असा सत्तारुढ महायुतीमध्येदेखील सूर आहे. अर्थात अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाचा असेल. मात्र, तूर्त आयोगात याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.
१४ वा १५ नोव्हेंबरला लागू शकतो निकाल
आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणत: ४५ दिवसांनी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असते. येत्या २६ नोव्हेंबरपूर्वी ४५ दिवस म्हणजे १२ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली तरी विहित कालमर्यादेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दिवाळी ३ नोव्हेंबर रोजी संपेल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होईल. १४ किंवा १५ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचे पहिले अधिवेशन बोलावण्याकरिता त्यानंतर १२ दिवस हाती असतील.
...तर महायुतीला मिळणार आणखी २ महिने
नोव्हेंबरमध्ये निवडणूक घ्या, अशी विनंती सत्तापक्षाकडून आयोगाला केली जाण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर निवडणूक झाली तर महायुती सरकारला आणखी दोन महिने मिळतील. त्यात आणखी निर्णय, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन, प्रारंभ करता येणार आहे.
२६ नोव्हेंबर अखेरचा दिवस का?
२०१९च्या निकालानंतर कुणीही सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यानंतर लागू झालेली राष्ट्रपती राजवट २२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर उठविण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, पण पवार परत गेले आणि सरकार कोसळले. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आले. त्याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २७ नोव्हेंबरला नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन झाले होते. त्यामुळे कायद्यानुसार त्या तारखेपासून पुढची पाच वर्षे म्हणजे २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ही विधानसभा अस्तित्वात असेल.