#VidhanSabha2019 : आघाडीच्या जागावाटपाचे ठरले; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 06:26 AM2019-09-16T06:26:01+5:302019-09-16T07:43:34+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले अ
पुणे/मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले असून, दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढविणार असून, मित्रपक्षांना ३८ देण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुणे येथे दिली.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल एक-दोन दिवसात वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीच्या जागा वाटप चर्चेला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील जागा वाटपावर चर्चा झाली. इंदापूरच्या जागेवरून दोन्ही पक्षात वाद होता. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या जागेचे भांडण परस्पर मिटले आहे. मुंबईतील जागावाटपही पूर्ण झाले असून, राष्ट्रवादी चार जागा तर उर्वरित जागा काँग्रेस लढविणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींशी या संदर्भात चर्चा केली आहे.
>या जागांवर नव्यांना संधी
राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), जयदत्त क्षीरसागर (बीड), राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद), दिलीप सोपल (बार्शी), शिवेंद्रसिंहराजे (सातारा), भास्कर जाधव (गुहागर) पांडुरंग बरोरा (शहापूर), संदीप नाईक (ऐरोली) या आमदारांनी सेना-भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे.