मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लगेच युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. त्याचवेळी लोकसभेत गाजलेलं 'ऐ लाव रे तो व्हिडीओ' याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांच 'ऐ लावर तो व्हिडिओ' गाजणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही तुरळक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांच्या या सभा कोणत्याही राजकीय पक्षासाठी नव्हत्या तर सत्ताधाऱ्यांविरुद्ध होत्या. राज यांच्या सभांना मोठी गर्दी जमली होती. त्या सभांमध्ये राज यांनी पुराव्यासह सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार घेतला होता. मात्र राज यांच्या सभांना जमलेली गर्दी सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी फारशी उपयोगी ठरली नसली तरी या सभांमुळे राज्यातील मनसेत उत्साह निर्माण झाला होता.
आगामी विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेचं युतीचं ठरलं आहे. तर वंचित बहुजन आघाडी देखील काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाईल याची शक्यता धुसर दिसत आहे. अशा वेळेस काँग्रेस-राष्ट्रवादीला मनसेची साथ मिळाल्यास विधानसभा निवडणूक आणखीनच रंगतदार होणार आहे. त्यामुळे राज यांचा सभांचा धडाका तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे ग्राउंड लेव्हलवर असलेले संघटन सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज ठाकरे विधानसभा निवडणुकीतही व्हिडिओद्वारे सत्ताधाऱ्यांच्या मागील पाच वर्षांतील कामाचे वाभाडे काढणार, की प्रचारासाठी आणखी नवीन ट्रीक वापरणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. लोकसभा निवडणुकीत राज यांचे 'ऐ लाव रे तो व्हिडिओ' चांगलेच गाजले होते. आता विधानसभा निवडणुकीत त्याचा दुसरा पार्ट येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.