मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेली भाजपची महाजनादेश यात्रा आज जालन्यात दाखल होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना जिल्ह्यात तयारीचा जोर आणखीच वाढला आहे.
नियोजनानुसार महाजनादेश यात्रा जालना जिल्ह्यात आज दाखल होणार असून रावसाहेब दानवे यांचे सुपूत्र आमदार संतोश दानवे यांच्या भोकरदन मतदार संघात आणि जालना शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहे. जालना जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत. यामध्ये बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे हे आहेत. तर जालना मतदार संघ शिवसेनेकडे असून अर्जुन खोतकर आमदार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा जालना शहरात होत आहे. मात्र या सभेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वास्तविक पाहता जालना मतदार संघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे जालना मतदारसंघावर भाजपची नजर तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत खोतकर यांचा निसटता विजय झाला होता. त्यावेळी स्वबळावर लढलेल्या भाजपने देखील चांगली मते घेतली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
खोतकरांचे बंड गुंडाळले
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध मोर्चा उघडला होता. त्यावेळी खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी खोतकर यांची मनधरणी केली होती. त्यावेळी खोतकर यांना विधान परिषदेचा शब्द दिल्याचे बोलले जात होते. परंतु, जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य मतदार संघाची निवडणूक नुकतीच झाली असून खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे खोतकर यांना काय शब्द देण्यात आला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस जालन्यात सभा घेणार असल्यामुळे ही भाजपची फिल्डींग आहे की, खोतकरांच्या विजयासाठीचा प्रयत्न आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.