मुंबई - अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून सर्वच पक्षातील नेतेमंडळी धडपड करत आहे. त्यातच आता गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे आणि जिल्ह्या परिषद सदस्य राजेश परजणे हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे ही जागा युतीत भाजपकडे असून स्नेहलता कोल्हे या विद्यामान आमदार आहेत. त्यामुळे विद्यामान आमदार यांना डावलून विधानसभा निवडणुकीत परजणे यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार का? अशी चर्चा पहायला मिळत आहे.
विखे पाटील हे भाजपमध्ये गेल्यानंतर नगर जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे. तर यावेळी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा निवडून आणण्याची जवाबदारी सुद्धा त्यांच्यावर असणार आहे. कोपरगाव मतदारसंघात भाजपच्या कोल्हे ह्या विद्यमान आमदार आहे. तर यावेळी पुन्हा त्यांचीच उमेदवारी निश्चित समजली जात आहे. मात्र कोपरगाव मतदारसंघातून आता राधाकृष्ण विखे पाटलांचे मेहुणे आणि शालिनीताई विखे यांचे धाकटे भाऊ राजेश परजणे यांनी सुद्धा निवडणूक लढवणारच, अशी भूमिका घेतली असल्याने भाजपसमोर राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यांचे आव्हान असणार असल्याची चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे.
कोपरगाव तालुक्यातील विकास ५० वर्षांपासून खुटलेला आहे. या खुटेलेल्या विकासला चालना देण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे परजणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे ठरवू, असेही ते म्हणाले. मात्र परजणे यांच्या 'एन्ट्रीने' विद्यामान आमदार स्नेहलता कोल्हे यांची चिंता वाढली आहे. येणाऱ्या काळात परजणे यांनी भाजपची उमेदवारी न मिळाल्यास, ते भाजप विरोधात रिंगणात उतरल्यास नवल वाटू नयेत.