हा अर्थसंकल्प म्हणजे 'खोटं नरेटिव्ह'! फडणवीसांच्याच शब्दात उद्धव ठाकरेंची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 04:43 PM2024-06-28T16:43:40+5:302024-06-28T16:46:01+5:30

Political Reaction on Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत गाजर दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे असं म्हटलं आहे. 

Vidhan Sabha Maharashtra Budget 2024: Uddhav Thackeray criticized the budget presented by Ajit Pawar | हा अर्थसंकल्प म्हणजे 'खोटं नरेटिव्ह'! फडणवीसांच्याच शब्दात उद्धव ठाकरेंची टिप्पणी

हा अर्थसंकल्प म्हणजे 'खोटं नरेटिव्ह'! फडणवीसांच्याच शब्दात उद्धव ठाकरेंची टिप्पणी

मुंबई - निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असेच अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल अशा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की,  गेल्या लोकसभा निवडणुकीत १० वर्षातील भाजपाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चीडलेल्या महाराष्ट्राने जो दणका दिला त्यातून सत्ताधाऱ्यांचे डोळे किलकिले झाल्यासारखं वाटतायेत. जनता यांच्या थापांवर विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी, सुजाण आणि सज्ञान आहे. कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचे षडयंत्र उघड झालं आहे. महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेला आहे. काही तरी धुळफेक करायची, जनतेला फसवायचं, खोटं रेटून बोलायचे आणि महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर यायचं हा यांचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच वारकऱ्यांना विकत घेण्याची परंपरा अर्थसंकल्पातून होतेय का, हा वारकऱ्यांचा अपमान आहे. देहभान विसरून विठुरायाच्या गजरात ते दिंडीत जात असतात. त्यांना पैशाची काही देणं घेणं नसते. मंदिराचा कळस बघून वारकरी दर्शन घेतात. त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही. त्याशिवाय मौलाना आझाद महामंडळाचा निधी वाढवलाय, त्यामुळे आता सरकारने निवडणुका बघून हिंदुत्व सोडलं का याचेही उत्तर सरकारने द्यावे. विधानसभा निवडणुका कधी होतायेत याची जनता वाट बघतेय. अर्थसंकल्पात सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. निवडणूक झाल्यानंतर हा सगळा जुमला होता असं बोलतील. हा अर्थसंकल्प आहे की जुमला संकल्प, या जुमलेबाजीला जनता फसणार नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना जनता पुन्हा सत्तेत आणणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली आहे. 

दरम्यान, अर्थसंकल्पातील योजनांसाठी आर्थिक तरतूद कशी करणार हा प्रश्न आहे. आजपर्यंत त्यांनी ज्या घोषणा केल्या त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या त्याबद्दल तज्ज्ञांची समिती नेमून त्याची श्वेतपत्रिका काढावी. अनेक घोषणा झाल्या परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. या अर्थसंकल्पाचं वैशिष्टे म्हणजे महिलांना मतदानात आपल्या बाजूला वळवण्याचा केविळवाणा प्रयत्न आहे. मुलगा आणि मुलगी भेदभाव करू नका याबद्दल कुठेही वाच्यता नाही. माताभगिनींना जे देताय जरूर द्या, हजारो तरूण बेरोजगार आहेत. रोजगारवाढीसाठी कुठेही उपाययोजना नाही असंही ठाकरेंनी म्हटलं. 

काँग्रेसचा हवाला देत भाजपावर टीका

शेतकऱ्यांना वीजबिल माफ करा अशी मागणी मी केली होती ती सरकारने मान्य केली. परंतु शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी मान्य केली नाही. वीजबिल माफी ही थकबाकीसह माफ करणार आहात का? काँग्रेस काळात निवडणुकीपूर्वी ज्याप्रकारे वीजबिल माफी केली होती, पुन्हा सत्तेत आल्यानंतर महिनाभरात दाम दुपट्टीने वीजबिल भरणा करा अशी दरडावणी सुरू झाली. तशीच ही दिसते. शेतकऱ्यांना एकाबाजूला लुटायचे आणि दुसऱ्या बाजूला उदारपणाचा भाव आणायचा असं सरकारचे धोरण आहे. या खोट्या मलमपट्ट्यांनी शेतकरी शांत होतील असं वाटत असेल तर ते अजिबात होणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली. 

Web Title: Vidhan Sabha Maharashtra Budget 2024: Uddhav Thackeray criticized the budget presented by Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.