मुंबई - फुलंब्री मतदारसंघाचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उमेदवारीवरून बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहे. वयाचे निकष लावत विधानसभा निवडणुकीत बागडे यांना यावेळी थांबण्याचे आदेश पक्षाकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या सर्वे चर्चेमुळे आणि बागडेंच्या उमेदवारीवरून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.
भाजपतर्फे गेल्या लोकसभा निवडणुकीत विविध निकष लावत काम न करणारे तसेच वय झालेल्यांना तिकिट नाकारले होते. तोच निकष आता विधानसभेला लावण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ७५ वर्षीय बागडे यांना यावेळी उमेदवारी नाकारल्या जाण्याची शक्यता आहे. तर बागडे यांना उमेदवारी मिळाण्याची शक्यता कमी असल्यामूळे फुलंब्री मतदारसंघातील भाजपमधील इतर इच्छुक जोमाने कामाला लागले आहेत.
बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी मोठ्याप्रमाणावर इच्छुकांनी गर्दी केली आहे. तर या इच्छुकांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरु केल्या आहेत. दुसरीकडे मात्र बागडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून चिंतेचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बागडे यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इच्छुकांची गर्दी
बागडे यांना वाढत्या वयामुळे यंदा उमेदवारी मिळणार की नाही, अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगली आहे. दुसरीकडे याच मतदारसंघातून प्रदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण, माजी महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर विजय औताडे, सुहास शिरसाठ यांनी उमेदवारी मागितली आहे.