देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ चिठ्ठीत नेमके होते काय?; अजित पवारांनी लगेच घोषणा केली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 06:22 AM2024-06-29T06:22:35+5:302024-06-29T06:23:11+5:30
अर्थसंकल्पाचे पुढे वाचन करताना छापील भाषणात पुन्हा या वीजबिल माफीचा उल्लेख होता. त्यांनी तो पुन्हा वाचला.
मुंबई : वित्त मंत्री अजित पवार हे अर्थसंकल्पाचे वाचन करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाजूलाच बसले होते. मध्येच फडणवीस यांनी एका कागदावर काहीतरी लिहिले आणि ती चिठ्ठी अजित पवारांना दिली. त्यात नेमके काय होते याची चर्चा पत्रकारांच्यात रंगली.
सूत्रांनी सांगितले की, अर्थसंकल्पाचे वाचन अर्धे पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या वीज बिल माफीची घोषणा अजित पवार यांनी का केली नाही, हा प्रश्न फडणवीस यांना पडला आणि त्यांनी या निर्णयाबाबत चार-सहा ओळींचा मजकूर लिहून त्यांच्या हातात दिला. ती चिठ्ठी बघून अजित पवार यांनी, आहे!, हा विषय पुढे आहे असे सांगितले. मात्र, त्याचवेळी फडणवीसांनी दिलेला मजकूर वाचून दाखवत त्यांनी वीजबिल माफीची घोषणा केली व नंतर ते पुढच्या मुद्द्यांवर गेले. अर्थसंकल्पाचे पुढे वाचन करताना छापील भाषणात पुन्हा या वीजबिल माफीचा उल्लेख होता. त्यांनी तो पुन्हा वाचला.
युवा वर्गासाठी विविध घोषणा अजित पवार करत होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाली बसूनच विरोधकांकडे पाहत, बघा! लाडक्या भावासाठी अर्थसंकल्पात काय काय आहे, अशी कोटी केली.