विदर्भातील लोकसभेच्या १०पैकी १० जागा जिंकून भाजप-सेना युती २०१४ साली मोदी लाटेवर स्वार झाली होती. नितीन गडकरींसारखा तगडी प्रतिमा असलेला राष्ट्रीय नेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गतिमानता, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या मंत्र्यांचा ताफा आणि रेशीमबागेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गावोगावी कार्यरत यंत्रणा हे भाजप-सेनेचे विदर्भातील बलस्थान आणि त्याला पूरक ठरणाऱ्या नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्या सभा असल्या तरी २०१४ ची हवा आता राहिलेली नाही. त्यामुळेच विदर्भातील राजकीय वातावरणाचा ग्राउंड रिपोर्ट २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील विदर्भाची हवा फिफ्टी-फिफ्टीचे संकेत देत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसरा पर्याय म्हणून उभे राहण्याचा चालविलेला प्रयत्न तसेच बहुजन महासंघाने लावलेली शक्ती नक्की कोणता परिणाम करणार हेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.नागपूर लोकसभा मतदारसंघात विकासकामे आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा सरळ माणूस या प्रतिमेचा नितीन गडकरी, यांना चांगला फायदा होताना दिसतो. थेट मोदींच्या विरोधात संघर्ष करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले यांची मदार त्यांची आक्रमक प्रतिमा व काँग्रेसमधील विविध गटांच्या कामगिरीवर आहे. या मतदारसंघात सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत गडकरी पावणेतीन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. यावेळी ते किती मते घेणार, हाच खरा प्रश्न आहे.
रामटेक : जातीय धु्रवीकरणावर मदाररामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या खा. कृपाल तुमाने यांच्यापुढे काँग्रेसच्या किशोर गजभिये या नवख्या उमेदवाराचे आव्हान आहे. शिवसेनेची प्रचार यंत्रणा गतिमान होत असताना काँग्रेसची यंत्रणा मात्र येथे सायलेंट मोडवर असल्याचे दिसून आले. ती गतिमान करणे हे उमेदवार आणि काँग्रेस पक्ष संघटनेपुढे मोठे आव्हान आहे. २०१४ च्या निवडणुकीत खा. तुमाने पावणेदोन लाख मतांच्या फरकाने विजयी झाले होते. यावेळी कुणबी, तेली, कोष्टी, मुस्लीम, मराठा मतांचा टक्का कुणाच्या बाजूने वाढतो, यावरच या मतदारसंघाचे भवितव्य आहे.
वर्धा : मेघेंच्या भूमिकेकडे लक्षवर्धा लोकसभा मतदारसंघातूनच महाराष्ट्रातील आपल्या सभांची मुहूर्तमेढ नरेंद्र मोदी यांनी रोवली होती. विद्यमान खासदार रामदास तडस आणि काँग्रेसच्या दिवंगत नेत्या प्रभा राव यांच्या कन्या चारु लता टोकस तसेच बहुजन समाज पार्टीचे शैलेश अग्रवाल यांच्यात लढत होत आहे. जातीय समीकरणात तेली, मराठा, दलित आणि मुस्लीम मतांचे विभाजन कसे होते, यावर निवडणुकीचा निकाल ठरेल. या मतदार संघात भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी तीन आमदार आहेत. कुणबी, तेली, सावजी समाज अधिक कुणाला जवळ करणार, यावरच निवडणुकीचा निकाल ठरेल. भाजप गोटातील माजी खासदार दत्ता मेघे यांचीही भूमिका निवडणुकीत रंग भरणारी ठरू शकते.
चंद्रपूर-आर्णी: काँग्रेसला गटबाजीचे ग्रहणचंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघात भाजपचे मंत्री हंसराज अहीर आणि शिवसेनेचे काँग्रेसमध्ये दाखल झालेले बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांच्यात लढत होत आहे. काँग्रेस उमेदवारीवरून उडालेला गोंधळ आणि पक्षांतर्गत गटबाजी थोपविणे अशा समस्यांना धानोरकरांना तोंड द्यावे लागेल. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदार संघात कुणबी आणि तैलिक समाजाचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.
अकोला : मतविभागणी कुणाच्या पथ्यावरअकोला मतदार संघात भाजपचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल आणि बहुजन वंचित आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यात काट्याची लढत होत आहे. या मतदार संघात अनुसूचित जाती-जमाती, नवबौद्ध, मातंग या मतांबरोबरच मुस्लीम बंजारा, धनगर, माळी, मराठा मते कुणाच्या बाजूने कौल देणार, यावरच या मतदार संघातील पहिल्या क्रमांकावर कोण उमेदवार जाणार, हे ठरेल.
यवतमाळ-वाशीम : शिवसेनेत बंडाळीहरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक व स्व. सुधाकरराव नाईक या माजी मुख्यमंत्र्यांच्या कर्मभूमीतील यवतमाळ- वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यातील लढत चांगलीच रंगतदार ठरणार आहे. भाजप बंडखोर उमेदवार बी. पी. आडे यांची उमेदवारी कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर बरीच गणिते बेतली आहेत. चारवेळा खासदार राहिलेल्या गवळी यांच्यापुढे माणिकराव ठाकरे यांनी कडवे आव्हान उभे केल्याचे दिसते. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
भंडारा-गोंदिया : इथेही जातीय तिढाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघावर माजी मंत्री खा. प्रफुल्ल पटेल यांचा प्रभाव आहे. याच मतदार संघातून नाना पटोले यांनी २०१४ साली पटेल यांचा पराभव केला होता. आता पटोले काँग्रेसवासी आहेत तर यावेळी राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे आणि भंडाऱ्याचे नगराध्यक्ष भाजपचे सुनील मेंढे यांच्यात ही लढत होत आहे. बेरोजगारी, शेती आणि मत्स्य व्यवसाय यासारखे प्रश्न या मतदारसंघात आहेत. तर पोवार, कुणबी, नवबौद्ध, माळी, तेली, लोधी, मराठा आदी समाजांच्या मतांचे विभाजन कुणाच्या बाजूने जाते, यावरच या मतदार संघाचा निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.
गडचिरोली-चिमूर: अॅण्टी इन्कम्बन्सी फॅक्टरगडचिरोली-चिमूर या मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते, काँग्रेसचे डॉ. नामदेवराव उसेंडी आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेश गजबे यांच्यात लढत होत आहे. आदिवासीबहुल असलेल्या या मतदार संघात जंगल अधिकार कायदा, तेंदूपत्त्याचा लिलाव यासारख्या जिव्हाळ्याच्या मुद्यांची चर्चा होते. खा. नेते यांची ही दुसरी टर्म असल्याने त्यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे. डॉ. उसेंडी त्याचा फायदा कसा घेणार, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.बुलडाणा : काँटे की टक्करबुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघाने चारवेळा शिवसेनेला मजबूत साथ दिलेली आहे. नवबौद्ध, मातंग, चर्मकार, महादेव कोळी, भिल्ल व पारधी, मराठा, धनगर आणि मुस्लीम समाजाच्या मतांना कोण आकर्षित करतो, यावरच निकाल अवलंबून आहे.अमरावती : घटक पक्षांचे महत्त्वअमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि महाआघाडीच्यानवनीत राणा यांच्यात लढत होत आहे.यादव, राजपूत, माळी, कुणबी, सोनार, मराठा, ब्राह्मण, सिंधी या समाजाची लक्षणीय मतदार संख्या आहे. महाआघाडीतील सर्वच घटक पक्षांची मोट राणा कशी बांधतात, यावरचत्यांचे भवितव्य अवलंबून आहे. या मतदारसंघात भाजपचे तीन, काँग्रेसचा एक तर अपक्ष दोन आमदार आहेत.उदासीन मतदाररणरणते ऊन आणि त्यात भर टाकणारी मतदारांची उदासीनता विदर्भातील अनेक मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण मात्र तापत नसल्याची साक्ष देत आहे. २०१४ साली नरेंद्र मोदींच्या सभेनंतर त्याचा परिणाम मतदानाच्या दिवसापर्यंत टिकल्याचा अनुभव आला होता.यावेळी मात्र हजारोंच्या सभा होऊनही तो, टिकाऊ स्वरूपाचा प्रभाव वर्धेत त्यांच्या झालेल्या शुभारंभाच्या सभेपासून ते परवाच्या चंद्रपूरच्या सभेपर्यंत जाणवला नाही. दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न यांचीही चर्चा होताना दिसत नाही.पी. नरसिंह रावसारख्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला लोकसभेत धाडणाºया रामटेकसारख्या मतदारसंघात मिहान, एनटीपीसीसारख्या प्रकल्पांची चर्चा करतानाच मतदार तिथल्या गडमंदिरावरील सोयीसुविधांच्या प्रश्नांवर मात्र पोटतिडकीने बोलताना दिसले.