दासगाव/महाड : गेली दोन दिवस पावसाने महाड तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे शहरी आणि ग्रामीण जीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांसह स्थानिक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात नगर पालिकेने आणि तालुक्यात तहसीलदार विभागाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. पुढील २४ तास अमावस्या असल्याने पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज ग्रामीण भागात वर्तविला जात आहे.महाड तालुक्याला गेले अठ्ठेचाळीस तास पावसाने चांगलेच झोडपले असून रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार कायम राहिली आहे. रविवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने महाड शहराजवळील सावित्री नदी धोक्याची पातळी धरून वाहत आहे. सततच्या पावसाने महाड -रायगड मार्गावरील दस्तुरी नाका परिसरात गांधारी नदीचे पाणी आल्याने हा मार्ग काही तास बंद होता. तर महाड शहरात येणाऱ्या गांधारी पुलावर देखील पाणी असल्याने महामार्गावरून शहरात येणारी वाहतूक बंद झाली होती. नाते गावातील पुलावरूनही गांधारी नदीला आलेल्या पुराचे पाणी गेल्याने नाते गावाचा काही संपर्क तुटला होता. कोथेरी गावातील दिवेकार वाडी येथे रविवारी दोन घरे कोसळली. किसन दगडू दिवेकर आणि हरिभाऊ चंद्रू दिवेकर अशी घरमालकांची नावे आहेत. साधारणपणे दोन लाख ११ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागामार्फत या घरांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत.
महाड तालुक्यात दक्षतेचा इशारा
By admin | Published: August 02, 2016 2:55 AM