मनमाड : तामिळनाडू राज्यात चेन्नई रेल्वेस्थानकावर घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमिवर नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षकांच्या सतर्कतेच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेचे प्रमुख जंक्शन असलेल्या मनमाड रेल्वेस्थानकावर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मनमाड येथे शीख धर्मियांचे देशातील तिसर्या क्रमांकाचे धार्मिक स्थळ असलेल्या गुरुद्वारा तसेच रेल्वे जंक्शन, रेल्वे कारखाना आदि महत्त्वाची ठिकाणी असल्याने दक्षता घेण्यात येत आहे. रेल्वेस्थानक परिसर फलाट क्र. १ ते ६ व प्रवासी गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे जवान श्वानाच्या मदतीने प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करत आहे. मनमाड हे प्रमुख रेल्वे जंक्शन तसेच देशातील प्रमुख शीख धर्मियांचे गुरुद्वारा, इंडिंयन आॅईल भारत पेट्रोलियम हिन्दुस्तान पेट्रोलियमची इंधन साठवणूक केंद्रे, आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाचे भारतीय अन्नमहामंडळाचे साठवणूक केंद्र, रेल्वेचा पूल निर्मिती कारखाना यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड शहर हे प्रमुख संवेदनशील शहर बनले आहे.
रेल्वेस्थानकावरील सर्व फलाट, बुकिंग कार्यालय, आरक्षण कार्यालय, वेटिंग रूम, पार्सल कार्यालय आदि ठिकाणी श्वान पथकाच्या साहाय्याने कसून तपासणी करण्यात येत आहे. रेल्वेस्थानकावर येणार्या व जाणार्या प्रवाशांच्या समानाची लगेज स्कॅनर मशीनने कसून तपासणी करण्यात येत आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक हरिश्चंद्र राठोड पो.नि. रमेश तायडे, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक बाबासाहेब नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
इगतपुरी : चेन्नई येथे बंगळुरू- गुवाहटी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात अनेक प्रवासी जखमी झाले, तर काही मृत्युमुखी पडले. त्यामुळे रेल्वे प्रवासी भयभीत झाले. त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटले आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी रेल्वेस्थानकावर मुंबईकडे जाणार्या व मुंबईहून येणार्या रेल्वेगाड्या श्वान पथकाच्या साहाय्याने इगतपुरी लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने तपासण्यात आल्या. दरम्यान, इगतपुरी लोहमार्गदरम्यान आजपर्यंत कोणतेही मोठे धोके निर्माण झाले नाही, अशी माहिती इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांनी दिली. तपासणीप्रसंगी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सतीश विधाते, सहायक निरीक्षक बी. के. राम, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश नागरे, दिनकर गांगुर्डे, संदीप जावळे, तेजसिंग राजपांडे, गिरीश राऊत, महिला पोलीस सुशीला शिके व श्वान पथकाचे भगत यांच्यासह रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)