मुंबई - राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा ‘राज कपूर जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व ‘राज कपूर विशेष योगदान’ पुरस्कार दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना घोषित झाला आहे. ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार अभिनेते विजय चव्हाण आणि ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी पुरस्कारांची घोषणा केली. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पाच लाख रुपयांचा, तर ‘विशेष योगदान’ पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये असे आहे.मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ व ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार, तसेच ‘राज कपूर जीवनगौरव’ व ‘राज कपूर विशेष योगदान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘चित्रपती व्ही. शांताराम’ पुरस्कार समितीचे सदस्य दिलीप प्रभावळकर, श्रावणी देवधर, श्याम भूतकर, तर ‘राज कपूर’ पुरस्कारासाठी समितीचे सदस्य असलेल्या नाना पाटेकर, समीर (गीतकार), सुरेश आॅबेराय यांनी परीक्षकांची भूमिका बजावली. यंदाच्या ५५व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.