ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 18 - भारतीय स्टेट बॅंकेने उद्योगपती विजय मल्ल्या यांचे १२०० कोटी रूपयांचे कर्ज माफ केले, मी एक गरीब माणूस असून सफाई कामगार आहे. त्यामुळे माझेही कर्ज याच धोरणानुसार माफ करावे, अशी मागणी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत काम करणा-या भाऊराव सिताराम सोनवणे या कर्मचा-याने स्टेट बॅंकेच्या त्र्यंबकेश्वर शाखेकडे केली आहे.
देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने देशातील ६३ बड्या उद्योगपतींना सात हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केले आहे. त्यात विदेशात पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्या याचा समावेश असून त्याचे १ हजार २०१ कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. लोकमतच्या या बातमीचा संदर्भ घेऊनच त्र्यंबकेश्वर येथील या सफाई कामगाराने स्टेट बॅंकेत हे पत्र दिले आहे.
भाऊराव सोनवणे याने आपल्या मुलाच्या आजारपणासाठी दीड लाख रूपयांचे कर्ज काढले आहे. तीन वर्षे मुदतीचे हे कर्ज आहे. यासंदर्भात बॅंकच्या शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, भारतीय स्टेट बॅंक यांनी वैयक्तीक कर्ज उद्योगपती विजय मल्या यांचे भारतीय स्टेट बॅंकेत असलेले १२०१ कोटी रूपयांचे कर्ज माफ केल्याचे लोकमत वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले आहे. ही बाब अत्यंत चांगली आहे. तरी मी आपणास विनंती करतो की, मी एक गरीब घरातून असून नगरपरिषदेत सफाई कामगार या पदावर काम करतो.
ज्या अर्थी आपली बॅंक मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करते, त्याच प्रमाणे माझे दीड लाख रूपयांचे वैयक्तीक कर्ज त्याच धोरणानुसार माफ करावे, ही विनंती असे नमुद करण्यात आले आहे. सोशल मिडीयावरून हे पत्र व्हायरल झाले असून सरकारचा उद्योगपतींना कर्जमाफी देण्याचा निर्णय आता सामान्यांना लागु करावा अशी टिप्पणी त्यावर होत आहे.