शिवतारेंचे बारामतीत बंड, शिंदे करतील का थंड? अजित पवार गटाची कल्याणमध्ये 'बदला' धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 09:25 AM2024-03-14T09:25:05+5:302024-03-14T09:25:43+5:30

विजय शिवतारे हे शिंदे गटात आहेत. अजित पवारांनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिवतारे लोकसभेला उतरणार आहेत.

Vijay Shivtare rebellion in Baramati, will Eknath Shinde cool down? Ajit Pawar group's threat of 'revenge' in Kalyan Shrikant Shinde NCP Maharashtra Politics | शिवतारेंचे बारामतीत बंड, शिंदे करतील का थंड? अजित पवार गटाची कल्याणमध्ये 'बदला' धमकी

शिवतारेंचे बारामतीत बंड, शिंदे करतील का थंड? अजित पवार गटाची कल्याणमध्ये 'बदला' धमकी

साडेचार वर्षांपूर्वीचा शिवतारे कसा निवडून येतो ते पाहतोचा लढा आता अजित पवारांना बारामतीत पाडतो पर्यंत आलेला आहे. गेल्या विधानसभेचा बदला विजय शिवतारेंनी आता लोकसभेत काढण्याची शपथ घेत काहीही झाले तरी अपक्ष लढणार असा चंग बांधला आहे. या चार वर्षांत सारे राजकारणच पालटले आहे. सुपात असलेले अजित पवार आता जात्यात अडकले आहेत. याचाच फायदा उचलण्याची संधी शिवतारेंनी साधली आहे. अशातच कल्याणच्या भितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईत येण्यास सांगितले आहे.

विजय शिवतारे हे शिंदे गटात आहेत. अजित पवारांनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिवतारे लोकसभेला उतरणार आहेत. बारामतीत काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवारांच्या काटेवाडीत कार्यकर्त्यांनी शिवतारेंचे जंगी स्वागत करून थेट आव्हान दिले आहे. सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरविणार आहेत. अशावेळी शिवतारेंची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. 

यामुळे शिवतारेंना थोपविण्यासाठी अजित पवार गटाने बारामतीत दगा फटका झाला तर त्याचा बदला कल्याणमध्ये घेऊ अशी धमकी दिली आहे. कल्याणमध्ये आधीच भाजपा श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवरून वाद घालत आहे. भाजपाचे स्थानिक नेते बंडाच्या पावित्र्यात आहेत. असे असताना राष्ट्रवादीनेही बंड केले तर शिंदेंच्या गडाला सुरुंग लागू शकतो. यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंना मुंबई भेटीचे निमंत्रण धाडले आहे. 

आता हे बंड शिंदे थंड करू शकतात की शिवतारे काहीही झाले तरीच्या प्रतिज्ञेवर ठाम राहतात यावर सारी राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत. 

शिवतारे काय म्हणालेले...
बारामती लोकसभा मतदारसंघावर कुणाचा सातबारा नाही. यावर मालकी कुणाची नाही. त्यामुळे पवार पवार करण्याऐवजी आपला स्वाभिमान जागरूक करून लढलेच पाहिजे असा ठराव कार्यकर्त्यांनी केली. अजित पवारांनी २०१९ च्या निवडणुकीत खालची पातळी गाठली. मी लिलावती रुग्णालयात दाखल होतो. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं नाटकं करतोय, तू कसा निवडून येतो हे बघतोच असं अजित पवार म्हणाले होते. राजकारणात उर्मट भाषा त्यांनी केली होती. मी त्यांना माफ केले, महायुतीत आल्यावर स्वागत केले. परंतु त्यांची उर्मट भाषा गेली नाही, यामुळे तो बदला घेण्यासाठी काहीही झाले तरी लोकसभेला अपक्ष लढणार असल्याचे शिवतारे म्हणाले आहेत. 

Web Title: Vijay Shivtare rebellion in Baramati, will Eknath Shinde cool down? Ajit Pawar group's threat of 'revenge' in Kalyan Shrikant Shinde NCP Maharashtra Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.