मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली आहे. मराठा समाजाबाबतची मंत्री छगन भुजबळांची वक्तव्यं दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे छगन भुजबळ असतील, त्या कोणत्याही मंचावर उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली होती. मात्र, आता विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली असून, उद्या होणाऱ्या हिंगोली येथील ओबीसी मेळाव्याला छगन भुजबळांसोबत हजेरी लावणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी मेळाव्याला जाण्याची आपली भूमिका विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी जाहीर केली. हिंगोली येथील ओबीसी मेळाव्याची आधीपासूनच तयारी करण्यात आली होती. सगळ्या ओबीसी बांधवांनी ही तयारी केली होती. तर, गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, ओबीसी नेत्यांची सुद्धा अशीच भावना आहे. मी भूमिका जाहीर केल्यानंतर मला अनेक फोन आले आणि मेळाव्याचा जाण्याचा आग्रह केला. लोकांच्या आग्रहाखातर हिंगोलीच्या मेळाव्याला मी जातोय, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
ओबीसींच्या हितासाठी लढा देणं माझं काम आहे, त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला जात आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ओबीसीसाठी भुजबळांनी सुद्धा आवश्यकता पडेल तर राजीनामा देण्यासाठी तयार असल्याची भूमिका मांडली आहे. तसेच, ओबीसीच्या हक्कासाठी भेद नको असं म्हणणारे नेते मला भेटले आहे. त्यामुळे, आमच्या भूमिकेमुळे चुकीचा संदेश जाऊ नये, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
याचबरोबर, विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर निशाणा साधला. सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही. सरकारमधील तीन पक्षांमध्ये सध्या बेबनाव सुरु आहे. तिघांच्या मनामध्ये ऑलवेल की अलबेल, हे मी लवकरच सांगेन. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांवर आरोप करतो. २० मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. एकमेकांच्या फाईली अडवा आणि जिरवा, असा उद्योग सर्रास सुरु आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
याशिवाय, जालना येथील आंतरवाली सराटी प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांच्या आदेशशिवाय लाठीमार होणे शक्य नव्हते. त्यांच्यावर कारवाई आवश्यक आहे. तसेच, फक्त ओबीसी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली व इतरांवर झाली नसल्याचा चुकीचा संदेश जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
पाच दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?ओबीसींच्या आरक्षण लढ्यात दोन समाजामध्ये विष पेरणं चुकीचं आहे. त्यामुळे यापुढे मी भुजबळांच्या मंचावर कुठल्याही कार्यक्रमात जणार नाही. सत्तेतल्या माणसाने समस्या सोडवायच्या असतात, दोन समाजामध्ये विष पेरणं सोपं आहे परंतु त्यातून कुणाचा जीव गेला तर कोण जबाबदार? दोन समाज भिडल्याने राज्यकर्त्यांना आनंद मिळणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.