मुंबई : एल्गार प्रकरणात राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत असून, भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर यावरूनच आता काँग्रेस नेते तथा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात भाजपची सत्ता असताना त्यांनी एल्गार प्रकरणाचा तपास त्यावेळी एनआयएकडे दिला पाहिजे होता, मात्र त्यांनी तो त्यावेळी दिला नाही. त्यामुळे हा तपास आत्ताच एनआयएकडे देण्याचे कारण काय ?, भाजपची सत्ता असताना फडणवीस यांना महाराष्ट्राच्या पोलिसांवर असलेला तो विश्वास आता राहिला नाही का ? असेही वडेट्टीवार म्हणाले.
तर राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यापसून, त्यात खोडा कसा घालता येईल यासाठी ते प्रयत्न करत असून त्यांना सत्तांतर पचनी पडत नाही. मात्र हे सरकार 5 वर्षे टिकणार असून, लोकांना दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करणार असल्याचे सुद्धा वडेट्टीवार म्हणाले.