मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली आहे. सहकार भवन बांधण्यासाठी मुंबै बँकेला गोरेगावच्या आरे कॉलनी येथील पशू संवर्धन विभागाच्या मालकीची तीन एकर जागा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसा शासकीय आदेश सोमवारी दुपारी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला होता. मात्र, काही वेळातच या आदेशाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरुन हटवण्यात आल्याने विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधत महायुती सरकार हे जनतेचे आहे की सत्ताधारी आमदारांना खैरात वाटण्यासाठी असा सवाल उपस्थित केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेला तीन एकर जमीन का देण्यात येत आहे. महायुती सरकार हे जनतेच आहे की सत्ताधारी पक्षातील आमदारांना खैरात वाटण्यासाठी आहे. आधी शासन निर्णय काढला, मग शासकीय संकेस्थळावरून का हटवला. महायुतीची चोरी जनतेपासून लपविण्यासाठी शासन निर्णय संकेतस्थळावरून हटवला आहे की निर्णय रद्द करण्यात आलेला आहे याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे.