मुंबई : गेल्यावेळीच्या सरकारमध्ये टँकर आणि जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप होत असतानाच आता, फडणवीस सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केला असून चौकशीची मागणी सुद्धा केली आहे.
गेल्यावेळी असलेल्या भाजप सरकाराच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर घोटाळा झाला आहे. तर बीड, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात फडणवीस सरकारने सुरु केलेल्या चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या खोटी दाखविण्यात आली. तसेच खोटी संख्या दाखवून तत्कालीन फडणवीस सरकारने 2018-19 या वर्षात आर्थिक घोटाळा केला असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून एका महिन्यात अहवाल सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्याचे सुद्धा ते म्हणाले.
विशेष म्हणजे याआधी राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सुद्धा फडणवीस सरकारच्या काळात घोटाळे झाले असल्याचे आरोप केले होत. दुष्काळाच्या काळात अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर घोटाळा झाला आहे. तर चारा छावण्यातही घोटाळा झाला असून तत्कालीन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली त्यातही घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता.