अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देणार? विजय वडेट्टीवारांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 11:30 AM2024-04-01T11:30:42+5:302024-04-01T11:31:45+5:30
Vijay Wadettiwar News: महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ. कोणताही तिढा राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला.
Vijay Wadettiwar News:महाविकास आघाडीतील नेते प्रकाश आंबेडकरांना सातत्याने सोबत येण्याची साद घालताना दिसत आहेत. असे असले तरी प्रकाश आंबेडकर आपल्या भूमिकेवर ठाम असून, वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचित महाविकास आघाडीत सामील होण्यासावरून आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. यातच आता अकोला लोकसभा जागेसाठी प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पाठिंबा देण्याच्या विचारात आहे. याबाबत काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक विधान केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यानंतर वंचितच्या उमेदवारांची संख्या १९ वर पोहोचली आहे. वंचित सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, त्या बदल्यात काँग्रेसला अकोल्यासाठी समर्थन मागणार नाही. एमआयएमसोबत न जाण्याचा पक्षाचा निर्णय होता. तो मी त्यांना कळविला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
आम्ही हायकमांडला कळवले आहे. त्यावर ते निर्णय घेतील
आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो. प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या सात जागांना पाठिंबा देत असतील, तर अकोला जागेसंदर्भात पुनर्विचार व्हावा, अशी आमच्या अनेक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे. यासंदर्भात आम्ही हायकमांडला कळवले आहे. त्यावर ते निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ. कोणताही तिढा राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अकोल्यात तीन वेळा मला पाडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुस्लीम उमेदवार दिला. आज तेथे मुस्लीम उमेदवार दिला तरी आम्ही तुमच्या सोबत येणार नाही, अशी भूमिका मुस्लीम बांधवांनी घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.