"भाजपला घर फोडण्यात असुरी आनंद"; अजितदादांच्या कबुलीनंतर विजय वडेट्टीवारांचे रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 07:59 PM2024-08-13T19:59:33+5:302024-08-13T20:04:39+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या कबुलीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
Vijay Wadettiwar : बारातमतीमधल्या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवानंतर आता अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभेच्या निकाल लागून दोन महिने उलटल्यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीला उमेदवारी देऊन चूक केल्याची कबुली दिली आहे. बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यानंतर आता अजित पवारांच्या विधानावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे निवडून आल्या. त्यानंतर आता अजित पवार यांनी एक आश्चर्यकारक कबुली दिली आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे चूक झाल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. पार्लामेंट्री बोर्डाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला होता असे अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवारांच्या या विधानावरुन विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. भाजपला घर उद्धवस्त होताना असुरी आनंद होतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
भाजपचे कुटुंबामध्ये भांडण लावण्याचे धंदे - विजय वडेट्टीवार
"देर आये दुरुस्त आये. पण त्यांना झुंजवण्यात आलं. भाजप हा पक्ष, घर फोडण्यात वस्ताद आहे. भाजपला घर उद्धवस्त होताना असुरी आनंद होतो. कुटुंबामध्ये भांडण लावण्याचे यांचे धंदे आहेत. इंग्रजांकडूनच ते हे शिकले आहेत कारण स्वातंत्र्यापूर्वी ते इंग्रजांसोबतच होते. त्यामुळे इंग्रजांची नीती आणि यांच्या नितीमध्ये फरक नाही. अजित पवार यांना हे समजले. अजित पवार हे इच्छेने नाही तर मजबुरीने गेले असल्याने त्यांना पश्चाताप होत असेल," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार?
"सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, मात्र सर्वच बहिणी माझ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. पण राजकारण हे घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. तेव्हा पार्लामेंट्री बोर्डाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला. आता एकदा बाण सुटल्यावर माघारी घेता येत नाही. परंतु आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं," अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे.