Rajeev Satav: राजकारणातला देवमाणूस गेला; विजय वडेट्टीवार यांना अश्रु अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 11:57 AM2021-05-16T11:57:21+5:302021-05-16T11:57:59+5:30
विजय वडेट्टीवार यांना राजीव सातव यांच्या निधनाबाबत भावना व्यक्त करताना अश्रु अनावर झाले.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले काँग्रेस नेते राजीव सातव यांचे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात गेल्या २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सातव यांची प्रकृती सुधारत होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. अखेर सातव यांची प्राणज्योत मालवल्याचे वृत्त काँग्रेसकडून देण्यात आले. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विजय वडेट्टीवार यांना राजीव सातव यांच्या निधनाबाबत भावना व्यक्त करताना अश्रु अनावर झाले. (vijay wadettiwar get emotional over rajeev satav sad demise)
राजीव यांच्या अचानक जाण्यामुळे काँग्रेसमधील भविष्यातील आश्वासक नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांकडून व्यक्त होत आहे. राजीव सातव यांच्या निधानाने काँग्रेस पक्षाचं कधीही भरुन न येणारं नुकसान झाले आहे. राजकारणातला देवमाणूस गेला, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राजीव, तू हे काय केलेस, तुझं असं जाणं भयंकर वेदनादायक; संजय राऊत भावूक
राजीव सातव तडफदार, अभ्यासू नेते
राजीव सातव तरुण तडफदार होते. अभ्यासू नेते होते. कोणत्याही विषयांवर बोलू शकतील, असे त्यांच्याकडे ज्ञान होतं. जिद्दीने आणि चिकाटीने काम करणे त्यांच्या रक्तात होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी आपली छाप दिल्लीत सोडली होती. व्यक्ती म्हणून ते हळवे होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना ते समजून घेऊन त्याच्यावर योग्य मार्ग काढत. आम्हाला नेहमी राजीव यांचे मार्गदर्शन लाभायचे. दिल्लीत गेल्यानंतर एक हक्काचा माणूस की ज्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या भावना सांगाव्यात आणि त्यांनी ते प्रश्न सोडवावेत, असा नेता आम्ही गमावला, असे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा
काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत
उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, अशी भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
तुला कोणत्या शब्दात श्रध्दांजली वाहू?
राजीव सातव तू हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे. चार दिवसापूर्वीच व्हिडीओ कॉलवर आपण नि:शब्द हाय, हॅलो केले. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे. तुला कोणत्या शब्दात श्रध्दांजली वाहू?, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.