Vijay Wadettiwar on Sharad Pawar नागपूर : लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांनी आगामी काळात प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. यावर यावर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल, त्यामुळे शरद पवारांना असे वाटणे स्वाभाविक आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता, ते म्हणाले की, शरद पवार मोठे नेते आहेत, हायकमांडकडे काय चर्चा होते, त्या संदर्भात मला माहीत नाही. शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचे आहेत. गांधी विचार कोणी संपवू शकत नाही. काही पक्ष हे अवकाळी पावसासारखे आहेत. अवकाळी पाऊस जनमाणसाला उद्धवस्थ करून जातो, तशी आताच्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे. परंतु काँग्रेस हा निरंतर वाहणाऱ्या नदीसारखा पक्ष आहे. ज्या विचारांनी हा पक्ष उभा झालेला आहे.
राजीव गांधी ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत विकास हा अजेंडा राहिलेला आहे. आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. जनता पूर्ण देश बदलण्याची तयारी करून बसलेली आहे. काँग्रेसच्या मागे जनता उभी असल्याचे दिसून येत आहे. पवार साहेबांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांना फार दूरच अभ्यास असतो. त्यांना दूरदृष्टी आहे. शरद पवारांचा जन्मच काँग्रेस आहे, गांधी विचारधार आहे. ते तालमीतच तयार झाले आहेतृ. यशवंतराव चव्हाण पासून त्यांच्या कारकीर्दी सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल, असे वाटणे स्वाभाविक आहे,असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, शरद पवार यांच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नुकतेच पुण्याला राहुल गांधी आले होते. त्यावेळी राहुल गांधींनी मला सांगितले की, राज्यात सर्वत्र प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये समाविष्ट होतील ही चर्चा आहे. भाजपाच्या तानाशाहीचा विरोधात अनेक पक्ष एकत्र येणार आहेत. अनेक पक्षांनी भाजपाच्याविरोधात त्यांच्या तानाशाहीच्या विरोधात मोट बांधावी, असे राहुल गांधी यांना सांगितले. त्यामुळे शरद पवार यांच्या वक्तव्यात तथ्य आहे. गांधी परिवारच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे अटी शर्ती काही नाही. कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत राहुल गांधींनी काढलेल्या पदयात्रा नागरिकांचा विश्वास वाढला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.