Vijay Wadettiwar on Narayan Rane Chandrakant Patil BJP: महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्या ( Shivaji Maharaj Statue News ) नंतर काही बडे नेते घटनास्थळी जाऊन पाहणी करत आहेत. काल उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे घटनास्थळी गेले. तेथे नारायण राणे समर्थकांचा त्यांच्याशी राडा झाला. तशातच दहीहंडीच्या दिवशी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुख्यात गुंड गजा मारणेसोबत एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. या दोन घटनांवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली. जिथे गुंडांना राजाश्रय मिळत आहे तिथे सामान्य जनतेने आपले रक्षण होईल या भाबड्या आशा ठेवू नये, असे त्यांनी ट्विट केले.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "लाडके गुंड‘: कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले. पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे, त्याच कोथरुड मधील आमदार चंद्रकांत पाटील. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी असतात पण परत निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत महायुतीला लाडके गुंड महत्वाचे आहे म्हणून सत्कार चमत्कार गुंडाकडून घेतले जात आहे.या भागातील नागरिकांना अश्या गुंडापासून संरक्षण देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना मंत्री महोदय गुंडाला ‘राजाश्रय‘ देत आहे"
पुढे वडेट्टीवार यांनी लिहिले, "भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार यांनी आणि त्यांच्या मुलाने पोलिसांची इज्जत कशी काढली हे काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने live पाहिले. पोलिसांना धमकावण्याचा असा माज खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे यांना कुठून आला हा प्रश्न जनतेला पडला होता. त्याचे उत्तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहे. या राज्यात पोलिसांची इज्जत राहिली नाही. मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेतात, आमदार पोलिसांना शिवीगाळ करतात, धमकावतात."
"जिथे गुंडांना राजाश्रय मिळत आहे तिथे सामान्य जनतेने आपले रक्षण होईल या भाबड्या आशा ठेवू नये.गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या या सरकारला आता जनतेने पुष्पगुच्छ देऊन निरोप द्यावा हीच राज्यातील जनतेला विनंती," असा खोचक टोला त्यांनी लगावला.