बदलापुरातील लहान मुलींसोबत घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. याच दरम्यान बदलापूर प्रकरणी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. "बदलापूर प्रकरण दाबण्यासाठी वकील म्हणून भाजपाच्या उज्वल निकम यांची नियुक्ती?" असा सवाल विचारला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बदलापूर प्रकरण दाबण्यासाठी वकील म्हणून भाजपाच्या उज्वल निकम यांची नियुक्ती? बदलापूर प्रकरणी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित, त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केली, ज्याने निवडणूक लढवली. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण?" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"लहान मुली आहेत... त्या नराधमाला भरचौकात फाशी द्यायला हवी. अक्षम्य गुन्हा आहे. ज्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कारवाई करा. त्यांचे मोबाईल चेक करा. गुन्हा दाखल केला पाहिजे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. वकील सुद्धा त्याच पक्षाचे, ज्यांनी निवडणूक लढवली आहे. तुम्हाला दुसरे वकील मिळत नाहीत का? उद्या हे प्रकरण दाबलं गेलं तर यासाठी जबाबदार कोण?"
"मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे नराधम आणि त्यांना साथ देणाऱ्यांचा तुम्ही काय बंदोबस्त करणार? काय कारवाई करणार आहात. लाडकी बहीण म्हणून पाठ थोपटून घ्याल. पण महिलांचं संरक्षण करणार नाही. तर महिला काय मागतील... संरक्षण की पैसे? महिलांनी संरक्षण मागितलं तर त्यामध्ये कोणतं राजकारण आलं?" असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे.