मुंबई - महाराष्ट्रामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा-शिवसेना महायुतीचा विजय झाला होता. मात्र निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी होऊन देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला सत्तेबाहेर बसावे लागले होते. दरम्यान, तेव्हा राज्यात घडलेल्याा घडामोडींबाबत राज्य सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची हे भाजपा नेते नितीन गडकरी यांच्याशी बोलून आधीच ठरवलं होतं, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या भाजपाच्या दोन बड्या नेत्यांमध्ये ३६ चा आकडा असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला.
नांदेड येथील बिलोली येथील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना विजय वडेट्टीवार यांनी हा दावा केला. वडेट्टीवार म्हणाले की, नागपुरवाल्यांना माहिती आहे. तिकडे भाजपामध्ये दोन टोके आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस आहेत. तर दुसरीकडे नितीन गडकरी आहेत. दोघांची तोंडं विरुद्ध दिशेला आहेत. दोघांमध्ये ३६ चा आकडा आहे. म्हणून गडकरींनी कानामध्ये गपचूप सांगितलं की, फडणवीसांची जिरवायची होती. तशी ती जिरली. आता पुन्हा जिवरायचीय. पण कुणाची जिरेल ते कळेल. मात्र मी सांगतो पुढचं केंद्रातील सरकार मात्र बदलणार आहे.