विखे फोन उचलत नाहीत; महाजन, खाडे, चव्हाणांबाबतही तोच अनुभव: अजितदादांचे आमदार भडकले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 05:13 PM2024-07-23T17:13:12+5:302024-07-23T17:14:33+5:30
अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा भाजप मंत्र्यांचं नाव घेत त्यांच्यावर जाहीरपणे टीका केल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील घटकपक्षांमधील कुरबुरी वाढू लागल्या आहेत. कधी जागावाटप तर कधी निधीवरून मित्रपक्षांचे नेते एकमेकांवर टीकेचे बाण चालवत असल्याचं चित्र आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीतील वातावरण खराब होऊ नये, यासाठी सर्वच घटकपक्षांच्या प्रवक्त्यांनी जाहीरपणे एकमेकांवर टीका करू नये, अशी सूचना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र फडणवीसांच्या या सूचनेनंतरही आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप करत टीकास्त्र सोडलं आहे.
"अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यात फिरकले नाहीत. मी काल जिल्ह्यातील एका प्रश्नाबाबत बोलण्यासाठी विखे पाटील यांना वारंवार फोन करत होतो. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. इतकंच काय तर त्यांचे स्वीय सहाय्यक, ओएसडी किंवा निवासस्थानातील कोणीही फोन उचलला नाही. शेवटी मी तहसीलदारांना फोन करून त्यांच्याशी संपर्क साधला. हे फक्त विखे पाटलांबद्दल नाही तर भाजपचे गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे यांच्याबाबतही मला तोच अनुभव आला आहे," असा हल्लाबोल अमोल मिटकरी यांनी केला आहे.
"आम्हाला जाणीवपूर्वक सहकार्य केलं जात नाही"
भाजपच्या मंत्र्यांवर निशाणा साधताना अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादीचे मंत्री महायुतीतील सर्व पक्षांच्या आमदारांची मदत करतात. मात्र भाजपचे मंत्री राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या आमदारांना सहकार्य करत नाहीत. जाणीवपूर्वक ही गोष्ट केली जात आहे," असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.
"उद्धव ठाकरेंवर टीका करता, पण तुम्ही तसेच वागताय"
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदारांना उपलब्ध नसल्याचा आरोप भाजपकडून केला जात असे. हाच धागा पकडून अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. "उद्धव ठाकरे हे व्हीसीद्वारे कारभार करत असल्याची टीका केली जाते. मात्र आता तुमचे मंत्री तरी कुठे आमदारांना सहकार्य करत आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना आपल्यात आणि त्यांच्यात फरक दिसायला हवा," असा टोलाही आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला लगावला आहे.
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा भाजप मंत्र्यांचं नाव घेत त्यांच्यावर जाहीरपणे टीका केल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.