- रवींद्र देशमुख
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळणार नाही, अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आधी मुलाला भाजपमध्ये पाठवले. त्यानंतर स्वत: भाजपमध्ये जाण्याचे नियोजन केले. हीच स्थिती विखे पाटील कुटुंबीयांची देखील होती. दोन्ही कुटुंबीयांचा पक्षांतर सोहळा सारखाच झाला. भाजपकडून विखे कुटुंबाला खासदारकी आणि मंत्रीपद देण्यात आले. पण मोहित पाटील कुटुंबाला काहीच मिळाले नाही. त्यामुळे मोहिते घराण्याने भाजपमध्ये जावून काय साध्य केलं असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबाने भाजपची वाट धरली. तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील आधीच भाजपमध्ये दाखल झाले होते. अहमदनगरमधून विद्यमान खासदाराला डावलून भाजपने सुजय विखेसाठी जागा रिकामी केली. त्याचीच पुनरावृत्ती रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर होईल अशी शक्यता होती. परंतु, तसं काहीही झालं नाही. रणजीतसिंह आणि विजयसिंह मोहिते पाटील यापैकी कुणालाच लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही.
दुसरीकडे भाजपमध्ये दाखल झालेले सुजय विखे खासदारही झाले. अशा स्थितीत मोहिते पाटील कुटुंबीयांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल अशी चर्चा सुरू होती. परंतु, विधानसभा निवडणुकीतही मोहिते कुटुंबाच्या वाट्याला निराशाच आली. तर काँग्रेसनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये जाताच सहा महिन्यांसाठी का होईना मंत्रीपद मिळाले. मुलगा खासदार आणि स्वत: मंत्रीपदी विराजमान झाल्याने विखे यांचे महत्त्व भाजपमध्येही वाढले आहे.
एकंदरीत भाजपमध्ये प्रवेश एकाच काळात आणि प्रवेशाची पद्धतही आधी मुलगा आणि नंतर वडिल अशीच झाली. परंतु, उमेदवारी किंवा मंत्रीपद देण्यात मोहिते आणि विखे पाटील कुटुंबात मोठी तफावत आहे. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश करून नेमकं साध्य काय केलं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.