मुंबई : गर्भलिंगनिदान कसे करावे? याबाबत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे कीर्तनातून भाष्य करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांनतर आता यावरूनच राजकीय प्रतिक्रिया येत असून, इंदोरीकर महाराजांनी थोडा संयम ठेवावा, असा सल्ला भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी इंदोरीकरांना दिला आहे.
गर्भलिंगनिदान कसे करावे? याबाबत इंदोरीकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याबाबत समर्थक आणि विरोधक यांचे अक्षरशः शाब्दिक युद्ध पेटले आहे. याच विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही कारवाईची मागणी केली आहे. याच विषयावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर यांच्या विरोधात भूमिका घेतली. तर याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात सुद्धा उमटताना पाहायला मिळत आहे.
याप्रकरणी अनेक राजकीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'इंदोरीकर महाराजांबद्दल नितांत आदर आहे. मात्र, त्यांनी थोडा संयम ठेवावा' असे विखे म्हणाले आहे. अहमदनगर येथे माध्यमांशी ते बोलत होते.