- रवींद्र देशमुख
मुंबई - दुसऱ्यांदा भूमिका बदलून काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने नगरी दणका दिला आहे. काँग्रसचे विरोधीपक्ष नेतेपद सोडून भाजपमध्ये जाताच मंत्रीपदी विराजमान झालेल्या विखेंनी नगरमध्ये युतीला 12-0 असा विजय मिळवून देईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या घोषणेला मतदारांनी केराची टोपली दाखवली आहे.
आधी मुलाला भाजपमध्ये पाठवून खासदार केल्यानंतर स्वत: भाजपमध्ये जावून मंत्रीपद घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांवर मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. विखे पाटील यांनीही संपूर्ण झोकात नगरच्या 12 पैकी 12 जागा जिंकून आघाडीला व्हॉईट वॉश देणार असल्याचे सांगितले होते.
शिर्डी मतदार संघातून विजयी झालेल्या विखेंनी त्यानुसार तयारीही केली होती. शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना पराभूत करण्यासाठी राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांनी प्रयत्नाची पराकाष्टा केली होती. मात्र विखे पिता-पुत्रांच्या इराद्यावर पाणी फिरले.
नगरमधील अकोले मतदार संघातून वैभव पिचड पराभूत झाले असून संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विजयी झाले. तर कोपरगावमधून भाजपच्या स्नेहलता कोल्हे पिछाडीवर आहेत. त्याचवेळी श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे, नेवासेमधून शंकरराव गडाख विजयाचे दिशेने असून राहुरीतून शिवाजी कर्डिले पराभूत झाले आहेत. पारनेरमधून काँग्रेसचे निलेश लंके, अहमदनगर शहर मधून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार विजयी झाले आहेत. तर शिर्डी, शेवगाव आणि श्रीगोंद्यात भाजपला यश मिळाले असून विखे पाटलांसह मोनिका राजळे आणि बबनराव पाचपुते विजयी झाले आहेत.
एकूणच 12 जागांपैकी 9 जागा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडे आल्या असून एक क्रांतीकारी शेतकरी पार्टी तर भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे विखे पाटील यांची आघाडीला व्हॉईट वॉश देण्याची घोषणा निव्वळ घोषणाच ठरली आहे.